लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी होमिओपॅथीसह इतर पॅथींनाही सहभागी करुन घ्यावे. आयुष मंत्रालयाचा सक्रीय सहभाग वाढवा, अशी अपेक्षावजा सूचना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.प्रतिभाताईंनी राम नवमीला पंतप्रधानांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. देशभरातील कोरोना बाधितांची सद्य:स्थिती आणि कोरोनाला नियंत्रणासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली. कोरोनावर सध्या कोणतीही लस आणि औषध उपलब्ध नाही. बाधितांवर केवळ अॅलोपॅथीच्या माध्यमातूनच उपचार सुरू आहेत. अॅलोपॅथी व्यतिरिक्त होमिओपॅथी, आयुर्वेद यांसह इतर औषध शास्त्रांमधे त्यावर औषधोपचार असल्याचा दावा काही डॉक्टरांकडून करण्यात येत असल्याचे प्रतिभाताई यांनी पंतप्रधानांना आवर्जून सांगितले.अन्य पॅथींमधे काम करणाऱ्या डॉक्टरांकडून उपचार असल्याचा दावा करण्यात येत असला तरी त्यांना कोरोना बाधितांवर उपचार करण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांना ते सिद्ध करता येत नाही. कोरोना बाधित रुग्णांना बरे करणे हा आपला उद्देश आहे. त्यासाठी पॅथी कोणतीही असली तरी चालेल. मात्र, इतर पॅथींना देखील उपचाराची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे. अॅलोपॅथीचे उपचार सुरुच ठेऊन, त्या जोडीला इतर पॅथींचे औषधोपचार करण्यास संमती दिली जावी, असा विचार त्यांनी मांडला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या सूचनांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. या चर्चेनंतर पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांना माहिती घेण्याचे आदेश मोदी यांनी दिले. पंतप्रधान कार्यालयातील सह सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी पुण्यातील होमिओपॅथी डॉक्टर अनिल हब्बू यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत उपचार पद्धतीविषयी माहिती घेतली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी साधला संवादप्रतिभाताई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या स्थितीविषयी दूरध्वनीवरुन माहिती जाणून घेतली. तसेच, राज्यातील रुग्णांवर अॅलोपॅथी बरोबरच आयुर्वेद आणि होमिओपॅथीचे उपचार करण्याचे सूचित केले.
कोरोनावरील उपचारांसाठी इतर पॅथींचा सहभाग घ्यावा; माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची पंतप्रधानांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 5:57 AM