कोल्हापूर : महापालिकेत शिवसेनेला वगळून भाजपने ताराराणी आघाडीशी केलेल्या युती संदर्भातील घडामोडी सोमवारी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालण्यात आल्या. संपर्कप्रमुखांसह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. येत्या आठवड्यात या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख, जिल्ह्यातील सहा आमदार, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांची आढावा बैठक होणार आहे. कुणाच्या तरी सांगण्यावरूनच चंद्रकांतदादांनी शिवसेनेशी युती केली नसल्याचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार, पदाधिकारी ‘मातोश्री’वर गेले होते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुखांसमवेत सर्वांनी पक्षप्रमुखांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कोल्हापुरात घडलेल्या घडामोडींबाबत माहिती दिली. महापालिकेच्या सर्वच जागा लढवून जिंकण्याची पक्षाची तयारी असल्याचे यावेळी त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार येत्या आठवड्यात जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होऊन पुढील रणनीती ठरणार आहे.अरुण दुधवडकर म्हणाले, आमचा मित्रपक्ष भाजपने कोल्हापूर महापालिका निवडणुकीत आघाडीचा निर्णय घेतला आहे. आम्ही नेहमीच त्यांच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला होता; परंतु त्यांनी तो हात झिडकारत आपला मार्ग निवडला आहे. नुकतेच भाजपचे नेते व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्याला जेवढे सांगितले जाते तेवढेच आपण करतो, असे सांगितले. त्यामुळे चंद्रकांतदादांना बहुदा वरूनच कोणीतरी शिवसेनेशी युती करू नये, असे सांगितलेले दिसते. कोणाच्या तरी सांगण्यावरूनच त्यांनी ताराराणी आघाडीशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे.भाजप जरी आमच्यासोबत नसली तरी आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आम्हाला आमचा मार्ग मोकळा असून, जनतेलाही कोण सच्चा आणि कोण झूठा हे माहीत आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीसाठी लोकांमध्ये जाऊन शहराच्या विकासासंदर्भातील पक्षाची भूमिका मांडू.आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी घेतलेली भूमिका व महापालिकेतील त्यांचा डाव ओळखूनच सहा महिन्यांपासून शिवसेनेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ८१ जागा लढविण्यासाठी आम्ही सक्षम असून, महापालिकेवर निश्चितच भगवा झेंडा फडकेल. यासाठी शिवसैनिक जिवाचे रान करतील. या संदर्भातील पुढील निर्णय पक्षप्रमुख घेतील. (प्रतिनिधी)भाजपची काँग्रेसच्या एका गटाशी युतीमहापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेला डावलून ताराराणी आघाडीशी केलेली युती ही काँग्रेसमधील एका गटाशी केलेली युती असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.घरावर घाला पडलायस्वबळावर निवडणुकीला सामोरे जाताना पक्षातील गटा-तटाचे काय, अशी विचारणा केल्यावर अरुण दुधवडकर यांनी विधानसभेसारखी स्थिती आता निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या घरावरच घाला पडला असल्याने आपापसांतील गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवा, अशा सक्त सूचना जिल्ह्यातील आमदार व पदाधिकाऱ्यांना केल्याचे सांगितले.
कोल्हापूरच्या घडामोडी उद्धव ठाकरेंच्या कानावर
By admin | Published: July 28, 2015 12:09 AM