गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अन्य राज्यांकडून येणाऱ्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अन्य राज्य कोरोना बाधितांच्या दररोजच्या संख्येबाबत योग्य माहिती देत नाहीत असं वाटतं, असं टोपे म्हणाले. तसंच राज्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमागे लोकांचा हलगर्जीपणा आणि कोरोनाच्या वाढत्या चाचण्या असल्याचंही त्यांन नमूद केलं. "या गोष्टीची शक्यता आहे की अन्य राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची योग्य संख्या सांगितली जात नाही. महाराष्ट्रात योग्य आणि पारदर्शकपणे सर्व पावलं उचलली जात आहेत. नुकतीच गुजरातमध्ये एक क्रिकेट मॅच पार पडली यावेळी ती मॅच पाहण्यासाठी ७५ हजारांपेक्षा अधिक लोकं आली होती. मी स्वत: ते टीव्हीवर पाहिलं. या गर्दीदरम्यान कोणीही सोशल डिस्टंन्सिंग पाळत नसल्याचंही दिसलं," असं टोपे म्हणाले. राजेश टोपे यांनी इंडिया टुडेशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं.
निवडणुका असलेल्या राज्यांवरही निशाणायावेळी राजेश टोपे यांनी निडणुका पार पडणाऱ्या राज्यांवरही निशाणा साधला. चार राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकांच्या रॅलीवर नजर टाकली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोणीही मास्क परिधान करतानाही दिसत नाही. हे सर्व पाहून ही राज्ये कोरोनाबाधित रुग्णांची योग्य संख्या नोंदवतात की नाही अशी शंका येत असल्याचंही टोपे म्हणाले. दरम्यान, टोपे यांनी राज्यातील लोकांना इशाराही दिला. जर राज्यात लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर सरकारकडे लॉकडाऊन लावण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसेल, असंही ते म्हणाले.
कडक कारवाईचे आदेश"सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कबाबतच्या नियमांचं पालन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी असे निर्देश सर्व जिल्हाधिकारी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सरकार सध्या लवकरात लवकर लसीकरण करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. आम्ही राज्यात दररोज जवळपास ३ लाख लोकांचं लसीकरण करत आहोत. या हिशोबानं आम्ही एका आठवड्यात २०-२१ लाख लोकांचं लसीकरण करत आहोत," असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.