लातूर : महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणावर ९ डिसेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास गाव, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर सर्व मराठा समाज बांधवांच्या वतीने ठिय्या आंदोलन करीत ‘बोलके मोर्चे’ काढू, असा इशारा मराठा आरक्षण समन्वय समितीने सोमवारी दिला. राज्यातील ४३ मराठा संघटनांचा समावेश असलेल्या मराठा आरक्षण समन्वय समितीची सोमवारी बैठक झाली. या बैठकीसाठी लातुरात आलेले समितीचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आरक्षणासाठी मराठा क्रांती मूक मोर्चे राज्यभरात काढण्यात आले. मात्र आरक्षणासंदर्भात अद्यापही राज्य सरकारने ठोस भूमिका घेतलेली नाही. राज्य शासनाने आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा ९ डिसेंबरनंतर राज्यभरात ‘बोलके मोर्चे’ काढण्यात येतील. या दिवशी राज्यभरातील मराठा समाजबांधव सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत राज्यातील रस्त्यांवर बैलगाडी, पशुधनासह उतरून ठिय्या आंदोलन करतील, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
...अन्यथा आरक्षणासाठी मराठा समाजाचे ‘बोलके मोर्चे’
By admin | Published: November 08, 2016 4:56 AM