मुंबई : निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने केलेल्या बहुतांश मागण्या वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्य केल्या आहेत. त्याउपर आंदोलन सुरू ठेवून कुणालाही रुग्णांच्या जिवाशी खेळू दिले जाणार नाही, असा इशारा वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. आंदोलनकर्त्या निवासी डॉक्टरांवर मेस्माखाली कारवाई करण्याचा सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.तावडे म्हणाले की, मार्डने केलेल्या मागणीनुसार नागपूर येथील प्रा. हुमणे यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. बंधपत्रीत सेवेकरिता जास्तीतजास्त जागा उपलब्ध होण्याकरिता वरिष्ठ निवासी या संवर्गातील रिक्त जागांवर बंधपत्रीत उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. बंधपत्रीत सेवा वाटप कालावधी ३ महिन्यांवरून २ महिने करण्यात येणार आहे. राज्यातील निवासी डॉक्टरांना सध्या दरमहा ४३ हजार रुपये विद्यावेतन मिळत असून, त्यामध्ये ५ हजार रुपयांची वाढ करण्याची सरकारची तयारी आहे. यासह अन्य मागण्या मान्य करावयाच्या झाल्यास शासनावर २५३ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. तरीही डॉक्टरांवरील कामाचा ताण व त्यांच्या निवासाची व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तावडे म्हणाले की, शासकीय इस्पितळातील रुग्णांच्या वतीने आपण निवासी डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करीत असून, ते आपल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देतील असा आपल्याला विश्वास वाटतो. (विशेष प्रतिनिधी)
...अन्यथा डॉक्टरांना ‘मेस्मा’ लावू!
By admin | Published: July 03, 2015 3:50 AM