मुंबई : शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती संपुष्टात आल्यानंतर दोन्ही पक्षांत शाब्दिक कलगीतुरे रंगू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारच्या मेळाव्यात शिवसेनेवर जोरदार प्रहार करत सेनेची औकात काढली. त्यावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘फार काही बोलणार नाही, नाहीतर माझाही घसा बसेल,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर काहीही बोलयाचे नाही, असे उद्धव यांनी सांगितले. भाजपाला काय टीका करायची ती करू द्या, आपण आपले काम घेऊन लोकांपुढे जाऊ. मुख्यमंत्र्यांची एक प्रतिमा होती. मात्र, ती आता मलिन झाली आहे. आता ते गुंडाचे मंत्री आहेत का? असा प्रश्न पडतो. मी मांडलेल्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर कोणीच बोलत नाही, आता ‘अच्छे दिन’बद्दलही कोणी बोलताना दिसत नाही. भाजपा मेळाव्याला संबोधित करताना, मुख्यमंत्री फडणवीस यांचा घसा बसला होता. त्यावर फार काही बोलणार नाही, नाहीतर माझा घसा बसेल, अशी भीती वाटते, अशी कोपरखळी उद्धव यांनी मारली. केंद्रात सत्ता आल्यापासून अयोध्येत राम मंदिर बनेल, असे भाजपाला वाटते. कदाचित हरवलेल्या विटा त्यांना सापडत असतील, त्यामुळे राम मंदिर बांधायला सुरुवात होईल, असा टोलाही उद्धव यांनी लगावला. आता सगळ्यांचे मुखवटे उतरले आहेत आणि खरे चेहरे समोर आले आहेत, असे सांगतानाच मुंबई-ठाणेकरांना दिलेली वचने पाळणार असल्याचे आश्वासनही उद्धव यांनी दिले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र आंबेरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. देवेंद्र आंबेरकर हे ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या हुकूमशाही कारभारामुळे काँगेसला सोडचिठ्ठी दिल्याचे आंबेरकर यांनी सांगितले.
नाहीतर माझाही घसा बसायचा!
By admin | Published: January 30, 2017 12:18 AM