ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 6 : दिवसेंदिवस महागाई वाढत असून सामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. बँकेतील व्यवहारांसाठीही आता कर आकारला जाणार आहे. त्यामुळे शासनाकडून जनतेची एक प्रकारे गळचेपी करण्यात येत असून याला विरोध करीत मनसेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या भावना शासना पर्यन्त पोहचवाव्यात असे निवेदन मनसे कडून प्रांताधिकारी नीता सावंत- शिंदे यांना देण्यात आले.मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मनसेच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन दिले. यावेळी मनसेचे दया मेस्त्री, समीर आचरेकर, शैलेंद्र नेरकर आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, युती शासनाने प्रति सिलेंडर 80 रूपये दरवाढ जाहिर केली आहे. यामुळे अच्छे दिन आणणार म्हणून सांगणाऱ्या युती शासनाच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरचे दर तिप्पट वाढले आहेत. रेशन दुकानदाराना बायोमेट्रिक प्रणाली वापर करण्याची सक्ती केली जात आहे. परन्तु गोरगरीबाना धान्य तसेच रॉकेल पुरवठा वेळेवर होत नाही.भाज्य, मासे, अन्नधान्य यांचे दर वाढले आहेत. विज देयकांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जनतेचे हाल होत आहेत. त्याकडे मंत्री , खासदार, आमदार तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
जनतेच्या अनेक समस्या असून भेसळ युक्त दूध विक्री करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, सर्व खाजगी दवाखान्यात उपचारांचे दरपत्रक लावावे अशा सामान्य जनतेसाठी आमच्या मागण्या आहेत. त्याकडे मुख्यमंत्री तसेच शासनाचे लक्ष वेधावे व जनतेला न्याय द्यावा. अन्यथा मनसेला आंदोलन करावे लागेल. असेही या निवेदनात म्हटले आहे.