ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - आज रात्री 8 पर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापू असा शेवटचा इशारा मार्डच्या डॉक्टरांना राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान जे जे रुग्णालयाने संपावर गेलेल्या डॉक्टरांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरु केली असून राज्यभरात अनेक ठिकाणी कारवाईला सुरुवातदेखील झाली आहे. दरम्यान निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेबाबतची उच्च न्यायालयातील सुनावणी उद्या होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गैरहजर असल्याने सुनावणी उद्यापर्यंत ढकलण्यात आली आहे.
नागपूरच्या सरकारी रुग्णालयातील 370 डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे. तर सोलापुरात 114 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत रजेवर गेलेल्या डॉक्टरांना नोंदणी रद्द करण्याची ताकीद देण्यात आली आहे. तर पुण्यातील 200 डॉक्टरांना नोटीस धाडण्यात आली आहे. बेकायदेशीररित्या सामूहिक रजेत सहभागी झाल्याचा ठपका डॉक्टरांवर ठेवण्यात आला आहे.
रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात संपावर गेलेल्या राज्यातील निवासी डॉक्टरांना उच्च न्यायालयाने मंगळवारी फैलावर घेतले. स्वत:च्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सामान्यांना वेठीस धरू नका. अन्य डॉक्टर काम करत आहेत, तुम्हालाच कशी भीती वाटते? कामावर रुजू व्हा अन्यथा नोकरी सोडा, अशा शब्दांत त्यांना खडसावले.
डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्शियल डॉक्टर्स’ (मार्ड) संघटनेने मंगळवारीही संप सुरूच ठेवला होता. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. मार्डला संपकरी डॉक्टरांना पाठीशी न घालण्याची सूचना खंडपीठाने केली. डॉक्टर सेवेत रुजू झाले नाहीत तर संबंधित रुग्णालय व्यवस्थापन त्यांच्यावर कारवाई करण्यास मोकळे आहे. संपकरी डॉक्टरांवर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही न्यायालयाने दिली. संपामुळे सरकारी व महापालिका रुग्णालयांचे ६० टक्के काम ठप्प झाल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली तर अफाक मांडविया यांच्या जनहित याचिकेच्या सुनावणीत अॅड. दत्ता माने म्हणाले, संपामुळे सोमवारी सकाळपर्यंत राज्यात ५८ रुग्णांचा मृत्यू झाला.
काय आहे प्रकरण?
सायन रुग्णालयातील डॉक्टर रोहित कुमार यांना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकाडून मारहाण करण्यात आली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध म्हणून रविवार संध्याकाळपासून सायनसह नायर आणि केईएम रुग्णालयातील रुग्णसेवा बंद आहे. या रुग्णालयात सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहे.
मार्डच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय?
– डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट 2010ची परिणामकारक अंमलबजावणी करा
– डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी
– निवासी डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा
– सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावा