मुंबई : राज्यातील १ लाख ४0 हजार आॅटोरिक्षा परवान्यांच्या नूतनीकरणाला थंड प्रतिसाद मिळाल्याने, परिवहन विभागाकडून आता कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरणाची मुदत असून, या मुदतीत नूतनीकरण न करणाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. ज्या आॅटोरिक्षा परवानाधारकांच्या परवान्यांची मुदत उलटली आहे, अशा परवानाधारकांना नव्याने परवाने प्राप्त करण्यासाठी काढण्यासाठी येणाऱ्या लॉटरी ड्रॉमध्ये अपात्र ठरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. नूतनीकरण न करता, धावणाऱ्या आॅटोरिक्षांविरोधात ३0 आॅक्टोबरपासून राज्यभर विशेष मोहीमही हाती घेतली जाणार आहे. राज्यातील रद्द व नूतनीकरण न झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांचे, काही अटींवर ३१ आॅक्टोबरपर्यंत नूतनीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. अशा १ लाख ४0 हजार आॅटोरिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले नसल्याचे निदर्शनास आले होते. मात्र, परवान्यांचे नूतनीकरणाची मुदत देऊनही त्याला थंड प्रतिसाद मिळाला आणि त्याचा २८ आॅक्टोबर रोजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यात बऱ्याच आॅटोरिक्षा चालकांनी परवान्यांचे नूतनीकरण न केल्याचे निदर्शनास आल्याने १६ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली. आता या अखेरच्या मुदतीतही आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण न केल्यास, कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नूतनीकरण न करणाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द केले जाणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. या तपासणीत दोषी आढळणाऱ्या रिक्षांची नोंदणी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार निलंबित किंवा कायमची रद्द करून त्या रिक्षा तांत्रिकदृष्ट्या पुनर्वापरासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहेत.
अन्यथा परवाने कायमचे रद्द
By admin | Published: October 30, 2015 1:04 AM