ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 22 - पेट्रोलपंप धारकांचे कमिशन वाढविण्याच्या मागणीला पाच वर्ष पूर्ण झाले तरीही सरकार कोणत्याच प्रकारचा निर्णय घेत नाही़ सरकार पेट्रोल पंप चालकांच्या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. यापुढे मागण्याबाबतची चालढकल खपवून घेणार नाही. पेट्रोल डिलर्सच्या मागण्या मान्य न झाल्यास देशात ३ व ४ नोव्हेंबर रोजी पेट्रोल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय ताटे-देशमुख यांनी दिली.
फॅमपेडा या राज्यशिखर संघटनेने सीआयपीडी व एआयपीडी या देशपातळीवरील संघटनेला डिलर कमिशन या प्रलंबित मागणीसाठी आंदोलनास पाठिंबा देण्यासंदर्भात शनिवारी येथील हॉटेल बालाजी सरोवर येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस फॅमपेडा संघटनेचे अध्यक्ष उदय लोध, महाराष्ट्र राज्य पेट्रोल डिलर असोसिएशनचे उपाध्यक्ष शैलेश मेहता, सोलापूर जिल्हा पेट्रोल डिलर असोसिएशनचे संजय ताटे-देशमुख, सेक्रेटरी महेंद्र लोकरे, पुरणचंद्र राव, सुनिल चव्हाण, नंदुशेठ बलदवा, डॉ़ सिध्देश्वर वाले, भावीन देसाई यांच्यासह अन्य मान्यवर व पेट्रोलपंप चालक उपस्थित होते.
पेट्रोल पंपचालकांच्या कमिशन वाढविण्याबाबत सरकार कोणताच निर्णय घेत नाही. कमिशन या विषयावरील आंदोलन यशस्वी करण्यासाठी व पुढील रणनिती आखण्यात आली. यावेळी आपले कमिशन किती असावे, त्याबाबतचे धोरण काय, केंद्र सरकारने तेल कंपन्यांना डिलरसाठी किती कमिशन ठरवून दिले आहे, नियमानुसार ठरलेले कमिशन का मिळत नाही याविषयी सखोल चर्चा या बैठकीत करण्यात आली.
पुढे बोलताना संजय ताटे -देशमुख म्हणाले की, फॅमपेडा व पेट्रोल डीलर असोसिएशन सोलापुर या संघटनेने मागील दोन वर्षात एलबीटी, एसएससी, व्हॅट, टँकर, एचपीसीएल, एलयूबी असे अनेक महत्वाचे विषय मार्गी लावले आहेत. यापुढील काळातही होणाºया आंदोलनास सहकार्य करण्याचे आवाहन ताटे - देशमुख यांनी यावेळी केले़ या बैठकीस सोलापूर शहर व परिसरातील पेट्रोल पंपधारक मोठया संख्येने उपस्थित होते.