ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - आमच्या मागण्यांवर 26 जुलैपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर निर्णायक आंदोलनाला सुरुवात करू, असा इशारा अजित नवले यांनी दिला आहे. ते आज मुंबईत सुकाणू समितीच्या बैठकीनंतर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटीलही उपस्थित होते. अजित नवले म्हणाले, आजच्या बैठकीत सर्व संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. राजू शेट्टी दिल्लीत असल्याने येऊ शकले नाहीत. त्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित आहेत. शेतक-यांना बिगर थकीत कर्जमाफी मिळायला हवी. शेतमालाला हमीभाव आणि स्वामिनाथन शिफारशीबाबत सरकारने चकार शब्द काढला नाही. आंदोलनाच्या सुरुवातीलाच 30 मागण्यांचं निवेदन सरकारला दिले आहे. त्यावर काहीच भूमिका घेण्यात आली नाही. सरकारी कर्जमाफीवर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. 9 जुलै रोजी नाशिक येथे सुकाणू समितीची परिषद होणार आहे. त्यानंतर नाशकातून सर्व जिल्ह्यांत संघर्ष यात्रा काढणार असून, 23 जुलैला पुण्यात संघर्ष यात्रेचा समारोप करू. शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
शेतकरी संघटना-आंदोलनादरम्यानच्या केसेस मागे घेण्यात आल्या नाहीत. त्या तातडीने मागे घ्याव्यात. द्राक्षे, डाळिंब, पॉलीहाऊस आदी शेतक-यांना वेगळे पॅकेज द्यावे. पंजाबच्या धर्तीवर आत्महत्याग्रस्त कुटुंबांचं सर्व कर्ज माफ करून पाच लाख द्यावे. आधी कर्ज भरा मग माफी मागा हा प्रकार अन्यायकारक आहे. कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतक-यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली. राज्यात व्यापारी बँकाकडून 46 हजार कोटी, सहकारी बँकांडून 34 हजार कोटींचे कर्ज शेतक-यांना मिळाले. त्यापैकी सरकारने केवळ 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली, असं म्हणत नवले यांनी सरकारच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली.