वर्धा : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची गती संथ असल्याचे बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीनतेवर कमालीची नाराजी व्यक्त केली. ३० जूनपर्यंत कामे पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्निवारी दिला. शेतकरी विषयक योजनांच्या आढावा बैठकीची सूचना मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाला दिली होती. त्या अनुषंगाने ते वर्धेत आले होते. दरम्यान, दोन विवाह सोहळ्यांना हजेरी लावल्यानंतर त्यांनी स्थानिक विकास भवनात आढावा बैठक घेतली़ बैठकीत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २१४ गावांमध्ये कामांचे नियोजन केले आहे. मात्र अत्यल्प कामे सुरू झाल्याबद्दल असमाधान व्यक्त करुन त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्णत्वास गेली नाही, तर दोषींना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. या अभियानाच्या कामावरच अधिकाऱ्यांचा सीआर ठरविला जाईल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. धडक सिंचन विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा, अशा सूचनाही यंत्रणेला दिल्या. (जिल्हा प्रतिनिधी)
अन्यथा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई !
By admin | Published: May 03, 2015 1:09 AM