बदलापूर : ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याची घाई राज्य सरकारने करू नये. या जिल्ह्यातील काही तालुक्यांची ठिकाणे ही नगरपंचायत होण्याची शक्यता असल्याने त्या नगरपंचायतींचा निर्णय घेतल्यावरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याची गरज आहे. अन्यथा, जिल्हा विभाजनानंतर पुन्हा नव्याने गठीत होणारी जिल्हा परिषद अल्पायुषी ठरेल, असे भाकीत माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. ठाणे आणि पालघर जिल्हा विभाजन झाल्यावर ठाणे जिल्हा परिषदेच्या नव्याने निवडणुका घेण्यात येणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र, नव्याने तयार झालेल्या जिल्ह्यातील वाडा, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावांची वाढती लोकसंख्या पाहता या तिन्ही गावांसाठी स्वतंत्र नगरपंचायती स्थापन करण्याचा निर्णय घेण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. तसेच या तीन गावांसाठी स्वतंत्र निर्णय झालेही पाहिजे. मात्र, नव्या नगरपंचायतींचा निर्णय घेतल्यावरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या २७ गावांची एकत्रित महापालिका स्थापन करण्याचा राज्य शासन विचार करीत आहे. त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषद अल्पायुषी ठरणार आहे. संभाव्य शक्यता लक्षात घेऊन आपण राष्ट्रवादी पक्षाचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
...अन्यथा ठाणे जि.प. पुन्हा अल्पायुषी!
By admin | Published: January 05, 2015 4:50 AM