अन्यथा... मतदान अधिकारी दाबणार ‘नोटा’सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरील (ईव्हीएम) एखाद्या गटात मतदान करण्यास नकार दिल्यास पोलिंग एजंटच्या साक्षीने मतदान केंद्र अधिकाऱ्यास नोटाचे बटन दाबून मतदान प्रक्रिया करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाने दिला असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी विजयकुमार काळम यांनी दिली. महापालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे. त्यामुळे मतदान करताना चार गटांतील बटन दाबले नाही, तर मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. व्होटिंग मशीनवर १५ उमेदवारांची नावे बसतात. पहिल्या गटातील नावे संपल्यावर एक नोटा बटन आणि त्यानंतर एक लॉक व त्यानंतर दुसऱ्या गटातील उमेदवारांची मतपत्रिका असेल. जिथे उमेदवारांची संख्या जास्त असेल तेथे मशीन जादा असतील. अशा प्रकारे प्रत्येक केंद्रावर दोन किंवा चार मशीन येणार आहेत. यात प्रत्येक गटातील उमेदवारांसाठी वेगवेगळ्या रंगांची मतपत्रिका तयार करण्यात आली आहे. प्रत्येक रंगातील उमेदवारांच्या पसंतीच्या नावासमोरील एक बटन दाबावे लागणार आहे. मतदान कसे करावे याबाबत निवडणूक कार्यालयात स्वत: आयुक्त काळम, उपआयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक घेण्यात आले. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन पोहोच करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी हुतात्मा स्मृती मंदिराच्या पाठीमागील आवारात ईव्हीएम मशीनवर मतपत्रिका बसविण्यात आल्या. तसेच सर्व मशीनच्या बॅटऱ्या चार्ज करून पॅक करण्यात आल्या आहेत. एक मतदान होण्यासाठी किमान दोन-तीन मिनिटे लागतील. झोपडपट्टी भागात मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी कालावधी वाढणार असल्याने मतदान केंद्रावर रांगा लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याप्रमाणे मतदान केंद्र अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एका मतदान केंद्रावर सहा व्यक्ती असतील. एक मतदान अधिकारी, दोन सहायक, एक शिपाई व दोन पोलीस असा फौजफाटा असेल. मतदान केंद्रावर लागणारे साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहेत. उमेदवारांच्या माहितीचे फ्लेक्स तयार झाले आहेत. ---------------------तक्रारी... केंद्र बदलल्याबाबत सलगरवस्ती येथील मतदान केंद्र बदलल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. जिल्हा परिषद शाळेत बुथ व्यवस्था असताना आंबेडकर शाळेत केंद्र हलविण्यात आल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांची गैरसोय होत आहे. तक्रारीप्रमाणे मतदान अधिकारी संदीप कारंजे यांनी केंद्राची तपासणी केली. मतदान केंद्राचे अंतर मोजले. वाढीव मतदारांमुळे असा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अन्यथा... मतदान अधिकारी दाबणार ‘नोटा’
By admin | Published: February 18, 2017 1:18 PM