नवी मुंबई : महसूलच्या महाभूलेख संकेतस्थळावर अखेर मोबाइल नंबरची नोंदणी हटवण्यात आली आहे. संकेतस्थळावर अद्यापही निम्म्याहून अधिक तालुक्यातील गावांचे सातबारा उपलब्ध नसतानाही ते मिळवण्यासाठी ओटीपीचा पर्याय ठेवला होता. मात्र, मोबाइल नंबर नोंदवल्यानंतरही ओटीपी मिळत नसल्याने सातबारा, आठ अ मिळवण्यात अडथळा निर्माण झाला होता.नागरिकांच्या तलाठी कार्यालयातल्या फेऱ्या कमी व्हाव्यात व कामात पारदर्शकता यावी या उद्देशाने महसूलच्या महाभूलेख या संकेतस्थळावर आॅनलाइन सातबारा, आठ अ मिळवण्याची सोय उपलब्ध करून दिली. मात्र, योजना सुरू होऊन चार वर्षांहून अधिक वर्षे उलटली तरीही डिजिटल सातबारा मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक अडथळे येत आहेत. निम्म्याहून अधिक तालुक्यातील गावांचे सातबारा संकेतस्थळावर नोंदवले गेलेले नाहीत. यामुळे सद्यस्थितीला विना स्वाक्षरीच्या आॅनलाइन सातबारावरच नागरिकांना समाधान मानावे लागत आहे. परंतु त्यावरील सूचीमुळे हे सातबारा शासकीय कामासाठी वापरात येत नसल्याने त्यावर तलाठीचा शिक्का घेण्यासाठी पुन्हा तलाठी कार्यालयाची पायरी चढावीच लागत आहे. सातबारा मिळवण्यासाठी संकेतस्थळावर मोबाइल नोंदणी आवश्यक होती. मात्र, मोबाइल नंबर नोंदवल्यानंतरही ओटीपी प्राप्त होत नसल्याने सातबारा मिळण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला होता. काही तालुक्यातील गावांचे सातबारा गट नंबर टाकताच विना प्रक्रिया ते प्राप्त होत. यावरून महसूलच्या महाभूलेख संकेतस्थळातील त्रुटींमुळे नागरिकांची होणारी गैरसोय ‘लोकमत’ने उघड केली होती. याची दखल घेत महसूल विभागाने संकेतस्थळातील ओटीपीची प्रक्रिया तत्काळ वगळली. त्यामुळे किमान विना स्वाक्षरीचा सातबारा तरी मिळवण्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना नागरिकांत आहे.
ऑनलाइन सातबारामधून ओटीपी वगळला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 5:32 AM