मुंबई - Pravin Darekar on Shrirang Barne ( Marathi News ) महायुतीत राहून एकमेकांविषयी नाराजी व्यक्त करणं योग्य वाटत नाही. श्रीरंग बारणेंची नाराजी ना पक्षासाठी, ना अजित पवारांवर आणि ना शिंदेंवर. जर प्रतापराव जाधवांऐवजी बारणे राज्यमंत्री झाले असते तर त्यांनी त्यावर समाधानी असल्याचं वक्तव्य केले असते. परंतु मंत्री झालं नाही म्हणून कुठेतरी संताप, नाराजी काढली पाहिजे या भूमिकेतून श्रीरंग बारणेंनी वक्तव्य केले आहे. १०५ आमदार भाजपाचे असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले असं संतप्त प्रतिक्रिया भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.
प्रविण दरेकर म्हणाले की, आपण एका विचारधारेवर हिंदुत्वाच्या भूमिकेवर एकनाथ शिंदेंसोबत युती केली. त्याचे सूतोवाच श्रीकांत शिंदे यांनीही केले आहे. जागांसाठी आपण एकत्र आलो नाही. तशीच भूमिका बारणे आणि सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे. महायुतीतील अंतर्गत गोष्टी जाहीरपणे न बोलता चार भिंतीत पक्षाच्या व्यासपीठावर बोलाव्यात अशी अपेक्षा सर्व महायुतीतील नेत्यांची प्रवक्त्यांची आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता बारणे बोलतायेत. त्यांच्या निवडणुकीत भाजपा आमदार प्रशांत ठाकूर आणि इतर कार्यकर्त्यांनी कशारितीने काम केले हेदेखील बारणेंना माहिती आहे. त्यामुळे आता बोललं तरी काय फरक पडतो, ५ वर्ष मी खासदार आहे अशा भूमिकेतून बोलणं योग्य नाही असं दरेकरांनी सांगितले.
तसेच मंत्री अनिल पाटील हे जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनीही अशा प्रकारचे जाहीर वक्तव्य करणे योग्य वाटत नाही. महायुतीत वितुष्ट निर्माण होईल असे कुणी वक्तव्य करू नये अशा सूचना सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी दिल्या पाहिजेत. छगन भुजबळ, अनिल पाटील म्हणाले त्याप्रमाणे ४० जागांच्या पक्षाला ८० जागा दिल्या तर उद्या शिंदे यांच्या पक्षालाही ८०-९० जागा द्याव्या लागणार. हे सूत्र लावले तर आमच्या १०५ जागा आहेत. मग आम्हाला २१० जागा द्याव्या लागतील. ३७० चे विधिमंडळ नाही २८८ जागा आहेत. प्रॅक्टिकल राजकीय परिस्थिती आणि निवडणूक निकालावर पक्षाच्या चार भिंतीत चर्चा व्हाव्यात. जाहीर वक्तव्य टाळावीत. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात तशीच अपेक्षा मित्रपक्षांकडून केली जातेय असंही प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले श्रीरंग बारणे?
आमचा स्ट्राइक रेट पाहून आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद दिलं पाहिजे होतं. एनडीएतील अन्य घटक पक्षातील काहींना १-१ खासदार असतानाही त्यांना कॅबिनेटपद देण्यात आलं मग भाजपाने शिवसेनेबाबत अशी भूमिका का घेतली? आम्हाला कॅबिनेटपदाची अपेक्षा होती. चिराग पासवान यांना ५ खासदार आहेत. मांझींकडे १ खासदार आहे. जेडीएसकडे २ खासदार तरीही त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. मग ७ लोकसभा खासदार असतानाही शिवसेनेला केवळ एक राज्यमंत्रिपद स्वतंत्र प्रभार का मिळाला? असा सवाल श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला.