मुंबई - सामनामधील अग्रलेखातून टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बोचरी टीका केली आहे. माझ्या घराण्याला राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम नगर जिल्ह्यातील जनतेने केले आहे. त्यामुळे आमची बांधिलकी त्या जनतेशी आहे. आमची बांधिलकी कधी मातोश्री तर कधी सिल्व्हर ओक अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही, असा टोला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टुरटुर या अग्रलेखामधून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्राच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. या पत्रात विखे पाटील म्हणतात, सामनामध्ये माझ्यावर अग्रलेख लिहिल्याबद्दल आभार, तुमच्या भाषेत सांगायचे तर मी सध्या वनवासात आहे. पण अशा वनवासात असलेल्या विखेंची तुम्हाला अग्रलेखाच्या माध्यमातून दखल घ्यावी लागली, हेही नसे थोडके. मी राजकारणापासून दूर राहावे असा सल्लाही आपण दिलाय. पण जनताजनार्दनाच्या साक्षीने सांगतो की, मी तुमच्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे तुमच्या सल्ल्याने राजकारणाबाहेर जाण्याचा प्रश्नच नाही. मला माझ्या मुलाला, माझ्या घराण्याला राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम नगर जिल्ह्यातील जनतेने केले आहे. त्यामुळे आमची बांधिलकी त्या जनतेशी आहे. आमची बांधिलकी कधी मातोश्री तर कधी सिल्व्हर ओक अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय, असा दुटप्पीपणा कोण करतेय हे लपून राहिलेले नाही, असा चिमटाही विखेंनी यावेळी काढला.
‘’बाळासाहेबांच्या काळात अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख लिहिले जात. आजच्यासारखी लाचारी तेव्हा नव्हती. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का? आम्ही पक्ष बदलले, पण ज्या पक्षात राहिलो, तिथे निष्ठेने काम केले. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल. मात्र मात्र तुमची छाती फाडून पाहिली तर त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोन नेते दिसतील, असा टोलाही विखे यांनी या पत्रातून लगावला.
मी भाजपात आनंदी आहे. पण स्वत:ला महाविकास आघाडीचा शिल्पकार म्हणवणाऱ्याला व्यक्तीला आपल्या भावाला मंत्रीदेखील करू न शकल्याचे दु:ख असेल आणि त्यातून आलेली अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल. पण त्यात माझा काय दोष. थोरांतांची कमळा असा काही उल्लेखही अग्रलेखात आहे. पण कमळ हातात घेण्यासाठी कुणी केव्हा, कुठे, कशी चाचपणी केली होती, हा वेगळा इतिहास आहे. ती चाचपणी यशस्वी झाली असती. तर हा उल्लेख कदाचित खरा ठरला असता. बाकी मातोश्रीविरुद्ध बंड करण्यासाठी कृष्णकुंजला कुणाची चिथावणी होती आणि कुणी वेळेवर यूटर्न घेतला, हा इतिहास अनेकांना माहीत आहेच. मी वेगळं काय सांगावं, असा चिमटाही विखे-पाटील यांनी पत्राच्या शेवटी काढला.
इतर महत्त्वाच्या बातम्या