पुणे : पाच राज्यांतील विधानसभांचे निकाल हेच सांगत आहेत, की जनतेला अच्छे दिनची फसवेगिरी नको आहे, तर हमारे दिन पाहिजे आहेत. सध्याच्या अकल्याणकारी सरकारची उलटी गिनती आता सुरू झाली आहे, असा दावा माजी उपमुख्यमंत्री व समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी केला.एका कार्यक्रमासाठी म्हणून पुण्यात आलेल्या भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह, माजी महापौर अंकुश काकडे त्यांच्यासमवेत होते. भुजबळ म्हणाले, ‘‘हे सरकार सत्तेवर आले व देशाचे अकल्याणच सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत बोलण्यासाठी वेळ नाही. अनेक आरोप होऊनही ते त्याचे निराकरण करण्यासाठी तयार नाहीत. त्यांचे सरकार आले विकासाच्या मुद्द्यावर; पण साडेचार वर्षांत काहीच केले नाही व आता राममंदिराच्या मुद्द्यावर देशात धार्मिक, जातीय ध्रुवीकरण करत आहेत. जनतेने त्यांना ५ राज्यांमधून मतपेटीद्वारे उत्तर दिले आहे. लोकसभेच्या येत्या निवडणुकीतही जनता त्यांना उभे करणार नाही.’’तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, की भाजपातून तसेच त्यांच्या आघाडीतून आता अनेकजण बाहेर पडत आहेत. राष्ट्रवादीमधून तिथे गेलेल्यांना आता परतीची ओढ लागली आहे, असे भुजबळ म्हणाले. त्यांना पुन्हा पक्षात घेणार का, यावर त्यांनी याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे सांगितले. पक्षाने आदेश दिला की कोणतीही निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत, असे ते म्हणाले.
जनतेला हवेत ‘हमारे दिन’; फसवेगिरी संपणार- छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 3:14 AM