विटा : साने गुरूजी यांनी श्यामची आईच्या माध्यमातून समाजाला आदर्श आई दिली आणि मी ह्यआमचा बाप अन् आम्हीह्ण या पुस्तकाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला आदर्श बाप दिला. या पुस्तकाची २०० वी आवृत्ती येत्या दोन महिन्यातप्रकाशित होणार असून या पुस्तकावर लवकरच ग्लोबल चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर हे माझ्या बापाची भूमिका साकारणार असल्याची घोषणा जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ व १९९ वी आवृत्ती प्रकाशित झालेल्या आमचा बाप अन् आम्ही या जागतिक पुस्तकाचे लेखक खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी विटा येथील साहित्य संमेलनात केली.
विटा येथे साहित्य सेवा मंडळ, मुक्तांगण वाचनालय व भारतमाता ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ३५ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात खा. डॉ. जाधव अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी आ. डॉ. पतंगराव कदम, माजी आ. सदाशिवराव पाटील, स्वागताध्यक्ष डॉ. विश्वनाथ बंडगर, कविसंमेलनाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ उपस्थित होते. यावेळी खा. डॉ.जाधव यांनी आमचा बाप व आम्ही या पुस्तकावर लवकरच ग्लोबल चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा पहिल्यांदाच विटा येथे बोलताना केली.
माझ्या बापाला वडील म्हटलेले अजिबात आवडत नव्हते. ते मला बापच म्हणा, असे नेहमी सांगत होते. माझ्या अशिक्षित बापाने मोडक्या-तोडक्या भाषेत लिहिलेल्या त्यांच्या आठवणी मी पुस्तकाच्या माध्यमातून समाजासमोर आणल्या. त्याच पुस्तकाच्या आज जगातील विविध भाषेत १९९ आवृत्त्या प्रसिध्द झाल्या आहेत. कोरियात या पुस्तकाच्या कोरियन भाषेतील सुमारे पावणेतीन लाखप्रतींची विक्री झाली. त्यामुळे माझ्या अशिक्षित बापाकडून जेवढे मी शिकलो, तेवढे शिक्षण मला जगात कोठेही मिळाले नसल्याचे भावनिक उद्गारही यावेळी खा. डॉ. जाधव यांनी काढले. साहित्याबाबत बोलताना खा. डॉ. जाधव म्हणाले, अभिजात साहित्य चांगले असते. साहित्य हे आरशासारखे असावे. ते आहे तसेच प्रतिबिंबीत झाल्यास साहित्यिकांच्या साहित्याला वेगळी झळाळी मिळेल. रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेली कविता मी प्रथम मराठी भाषेत आणली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या चैतन्याचा झरा आहेत. जैविक अर्थाने आई-वडिलांनी आम्हाला जन्म दिला असला तरी, माणूस म्हणून उभे करण्याचे काम डॉ. आंबेडकर यांनी केले. त्यामुळे त्यांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आ. डॉ. पतंगराव कदम म्हणाले, खा. डॉ. जाधव हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांना मी निवांतपणे भेटून, नोटाबंदीमुळे देश व महाराष्ट्र कोठे चाललाय, याबाबत चर्चा करणार आहे. विट्यातील साहित्य संमेलनाची परंपरा गेल्या ३५ वर्षांपासून अखंडपणे सुरू असून, ही कौतुकास्पद बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. साहित्य सेवा मंडळाचे अध्यक्ष रघुराज मेटकरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सकाळच्या सत्रात ज्येष्ठ कवी रवींद्र बेडकीहाळ यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यावेळी अंधकवी चंद्रकांत देशमुखे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, डॉ. दीपाली घाडगे, अशोक पवार, कवी गुंजाळ, चंद्रबदनलांडगे, बबुताई गावडे, शकुंतला होनमाने, स्वाती शिंदे-पवार यांच्यासह सुमारे ७५ कवींनी सहभाग घेतला.