ऑनलाइन लोकमत,
मुंबई, दि. 11- दादर येथील आंबेडकर भवन हे काही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक नव्हते. बाबसाहेबांनी पीपल्स इंप्रुव्हमेंट ट्रस्टसाठी ही जागा घेतली होती. या जागी आंबेडकर भवन व्हावे हीच आमची भावना आहे. मात्र, ते उभारताना प्रकाश आंबेडकर व कुटुंबियांवर अन्याय होता कामा नये. इथे जी सतरा मजली इमारत होणार आहे तिथे आंबेडकर कुटुंबियांना प्रेस व कार्यालयासाठी सात-आठ हजार फुटांची जागा द्यावी अथवा सध्याच्या प्रेसच्या जागेचा अडतीसशे फुटांचा भूखंड त्यांच्यासाठी सोडून बांधकाम करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री आणिं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सोमवारी केली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आंबेडकर भवनाच्या ट्रस्ट वर कोणी असावे याच्याशी आम्हाला काहीच कर्तव्य नाही. ट्रस्टींबाबत धर्मदाय आयुक्तांनीच शहानिशा करायची आहे. जे योग्य असतील त्यांच्याकडे ट्रस्टचा कारभार सोपवावा. याबाबत मी बैठक बोलावल्यास प्रकाश आंबेडकर त्याला उपस्थित राहणार नाहीत. मात्र, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये अशीच आमची भूमिका आहे. या प्रश्नी पुढाकार घेऊन बैठक घेऊन मार्ग काढावा अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. देशभर आरक्षणाच्या मागणीसाठी विविध समाजांकडून आंदोलने होत आहेत. त्यामुळे वातावरण बिघडत आहे. सध्या लागू असलेल्या ५० टक्के आरक्षणाला धक्का न लावता या सर्व समाजांना आर्थिक निकषावर २५ टक्के आरक्षण देण्यात यावे. त्यामुळे एकूण आरक्षणाचे प्रमाण ७५ टक्के होईल तसेच सर्वच घटकांना न्याय मिळेल, असे रामदास आठवले म्हणाले.महाराष्ट्रात दलित अत्याचार प्रतिबंधाचा अॅट्रॉसिटी कायदा १९८९ मध्ये करण्यात आला. या कायद्यातील कलमे कडक असली तरी ही प्रकरणे नीट हाताळली जात नाहीत. या कायद्याचा कुणी गैरवापर करू नये हे जसे खरे आहे तसेच ज्यांनी खरोखरीच दलितांवर अन्याय अत्याचार केले आहेत तेही मोकळे सुटता कामा नयेत. ज्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो तो लगेच जामीनावर सुटतो. पण, तक्रारदार दलित मात्र चोरी, दरोड्याच्या खोट्या आरोपाखाली गजाआड होतो. हे प्रकार टाळण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असे आठवले म्हणाले. आपण रामदास आठवले यांना ओळखत नाही, अशी कडवट प्रतिक्रीया प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर भवनाच्या वादासंदर्भात बोलताना दिली होती. याबद्दल विचारले असता आठवले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर जरी मला ओळखत नसले तरी बाबासाहेबांचे नातू म्हणून मी त्यांना ओळखतो. त्यांचा आदर करतो, असे आठवले म्हणाले.महायुती ५ वर्षे टिकविणार आजच मातोश्री येथे उद्धव ठाकरेंची भेट धेतली. शिवसेना व भाजपात वाद नसावा आणि चांगले संबंध राहावेत, अशी भावना मी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्य सरकारमधील महत्वाचे निर्णय घेताला मित्रपक्षाला विश्वासात घेण्याची शिवसेनेची मागणी रास्त आहे. महायुतीचे सरकार ५ वर्षे एकजुटीने काम करेल असे आठवले यांनी स्पष्ट केले.