"आमची लढाई ही कुठल्या एका व्यक्ती किंवा संस्थेच्या विरोधात नसून राजकीय भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. दरम्यान आता पर्यंत २७ घोटाळे आपण बाहेर आणले असून ३१ डिसेंबरपर्यंत आणखी २३ घोटाळे बाहेर काढणार आहोत. या घोटाळ्यांपैकी १९ प्रकरणात सध्या सुनावण्या सुरू आहेत," असे भाजपा नेते किरीट सोमस्या यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले.
बुलडाणा अर्बन पतसंस्थेने अशोक चव्हाण यांच्या कारखान्यांना दिलेल्या कर्जाच्या संदर्भाने आढळलेल्या १२०० खात्यांमधील त्रुटीचा मुद्दा घेऊन ते बुलडाण्यात आले होते. यावेळी त्यांनी शहर भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत उपरोक्त बाब स्पष्ट केली आहे.
राजकीय भ्रष्टाचार संपुष्टात आला तर खालच्या पातळीवर होणारा भ्रष्टाचारही आपोआप कमी होऊन संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे राजकीय भ्रष्टाचाराविरोधात आपली लढाई असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले.