मुंबईः राज्यातील राजकीय पेच आता संपुष्टात आला असून, उद्धव ठाकरे सरकार सत्तेवर आलेलं आहे. तर भाजपाला विरोधात बसावं लागलं आहे, विशेष म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनीही त्यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली होती. उद्धव ठाकरेंना ट्विटरच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी शुभेच्छा देत आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!!एका ठाकरेंनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले. हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे, 'राज्याचे हित प्रथम '!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा, असं पंकजाताई ट्विट करत म्हणाल्या होत्या, त्यावर आता उद्धव ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे.उद्धव ठाकरेंनी ट्विटरच्याच माध्यमातून शुभेच्छांचा स्वीकार करत पंकजा मुंडेंचे आभार व्यक्त केले आहेत. आपले मनःपूर्वक धन्यवाद पंकजाताई मुंडे! 'राज्याचे हित प्रथम' याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल, असा विश्वास मी तुम्हाला देतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे भाजपामध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
आपलं सरकार मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल; उद्धव ठाकरेंची पंकजाताईंना ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 6:33 PM