औरंगाबाद : आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो परदेशात कचराकुंडीवर लावला जातो. भाजपचा टिनपाट प्रवक्ता व भाजपच्या विद्यमान धोरणामुळे देशावर अपमानीत होण्याची वेळ आली, अशी घणाघाती टीका करतानाच राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, आमचे हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम देणारे आहे, असे वक्तव्य औरंगाबादेत बुधवारी झालेल्या जाहीर सभेत केले.
शिवसेनेच्या मराठवाडा शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित स्वाभिमान सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी भाजपला जोरदार टोले लगावले. सत्तेत असूनही हिंदू हित साधले जात नसेल, काश्मीरमधील पंडित काश्मिरात राहू शकत नसतील, त्यांचे दिवसाढवळ्या मुडदे पडताना पाहून ढिम्म बसणारी भाजप नागरिकांना तुम्हाला अपेक्षित होती का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला. ते म्हणाले, शिवसेनेचे कुणीही अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासाठी आले नव्हते, असे फडणवीस सांगतात. परंतु मी त्यांना आठवण करून देतो की, याच औरंगाबादेतून शिवसेनेचे तत्कालीन खासदार मोरेश्वर सावे शिवसैनिकांसह अयोध्येला गेले होते. त्यांचे चिरंजीव अतुल सावे सध्या भाजपचे आमदार आहेत. मी या सावेंना विचारतो, अरे फडणवीसांना जाऊन सांगा, माझे बाबा अयोध्येला गेले होते. नसेल गेले तर तसेही सांगा.
ज्यांना शत्रू समजलाे ते मित्र झाले; अन् ३० वर्षांचा मित्र झाला हाडवैरीसध्या गाजणारा हिंदुत्वाचा मुद्दा धरून ते म्हणाले, आमचे हिंदुत्व कसे, हे मोजणारे तुम्ही कोण? ज्यांना आम्ही पंचवीस, तीस वर्ष मित्र म्हणालो, तेच आता हाडवैरी झाले व ज्यांची आम्ही संभावना शत्रू म्हणून केली त्यांनी मैत्रीचा हात पुढे करून उज्ज्वल महाराष्ट्र घडविण्याची संधी दिली.भाजपची नाटके केवळ सत्तेसाठी विरोधी पक्षात असताना भाजप हिंदू हिताच्या घोषणा करीत होता. हिंदूंचे सणवार असतानाही महागाईविरुद्ध बंद घडवून आणत होता. आता महागाई प्रचंड वाढली आहे. रुपया दररोज गडगडतो आहे. पेट्रोलचे भाव ६० पैसे वाढले म्हणून बैलगाडीने संसदेत जाणारे अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप आम्हाला आता पाहायचा आहे, असे हिणवत ठाकरे म्हणाले, भाजपचे ही सर्व नाटके केवळ सत्तेसाठी होती, हे आता स्पष्ट दिसतेय.
गुडघे टेकण्याची वेळ का आली?मध्य आशियातील मुस्लीम देशासमोर भारत देशाला गुडघे टेकण्याची वेळ का आली? भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे देश अपमानीत झाला. भाजपचीही वागणूक देशाला, महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे? - उद्धव ठाकरे