मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारातएकनाथ शिंदे गटाच्या आणि भाजपच्या मिळून एकूण 18 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. दरम्यान, शिवसेनेशी बंड करून एकनाथ शिंदे गटात गेलेल्या 9 आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. दरम्यान, यामध्ये भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचेही नाव समोर आले होते. मात्र, त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. यानंतर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे असल्याचे सांगत अधिवेशन संपलं की दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडणार आहे, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर विरोधकांची तोंडं बंद झाली आहेत. येत्या 17 ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन संपलं की दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये माझ्यासारख्यांचा, बच्चू कडू यांच्यासारख्यांचा विचार केला जाईल, असे भरत गोगावले म्हणाले. याचबरोबर, संजय राठोड यांना दिलेल्या मंत्रिपदावरून टीका सुरू झाली. यावर भरत गोगावले म्हणाले की, "राठोड हे त्या प्रकरणातून सहीसलामत बाहेर आले आहेत. त्यांना कार्टाने क्लीनचीट दिलेली आहे, त्यामुळे त्यांना आम्ही मंत्रिपद दिलं आहे. जर कुणी टीका करत असेल तर त्यांना करू द्या, पण आम्हाला काम करायचे आहे, आम्ही काम करत राहणार."
दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे गटाचे तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर प्रताप सरनाईक, भरत गोगावले यांचेही मंत्रीपदासाठी नाव समोर आले होते. पण, त्यांना आजच्या मंत्रिमडळ विस्तारात संधी देण्यात आली नाही. भरत गोगावले महाडचे आमदार आहेत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नेत्यांमध्ये भरत गोगावले हे देखील एक आहेत. सरपंच ते आमदार आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असा भरत गोगावले यांचा प्रवास आहे. 1992-93 पासून ते शिवसेनेशी जोडले गेले. त्यानंतर ते एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमध्येही ते त्यांच्यासोबत होते.