मुंबई: भाजपकडून राज्यसभेचे खासदार असलेले संभाजीराजेंनी पुढील निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी याबद्दलची घोषणा केली. भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीनं आपल्याला मदत करावी, अशी साद त्यांनी घातली. भाजप आणि मविआकडे अतिरिक्त मतं आहेत. या जादा मतांच्या आधारे आपण निवडून येऊ शकतो, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. संभाजीराजेंनी मांडलेल्या गणितावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं.
राज्यसभेचा उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी ४१ मतं आवश्यक असतात. महाविकास आघाडीकडे २७ अतिरिक्त मतं आहेत. ती मतं संभाजीराजेंना मिळणार का, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर पवारांनी महाविकास आघाडीचं मतांचं गणित सांगितलं. 'राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज निवडून येईल. तितकी मतं पक्षाकडे आहेत. एक जण निवडून गेल्यावरही आमच्याकडे १० मतं शिल्लक राहतात,' असं पवार म्हणाले.
'शिवसेनेकडे गरजेपेक्षा अधिक मतं आहेत. त्यांचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाईल आणि त्यानंतरही काही मतं उरतील. सत्तेतील तिसरा पक्ष असलेल्या काँग्रेसकडेही अतिरिक्त मतं आहेत. त्यामुळे काही कमी-जास्त असेल तर आमचे लोक त्यांना मदत करतील,' असं शरद पवारांनी सांगितलं.
राज्यसभेचं गणित काय?सध्या भाजपकडून राज्यसभेवर असलेल्या संभाजीराजेंनी पुढील निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्यसभेवर जायचं असल्यास ४१ मतं लागतात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस राज्यसभेसाठी प्रत्येकी एक उमेदवार देतील. त्यांचे उमेदवार विजयी होऊनही त्यांच्याकडे अधिकची २७ मतं असतील. तर भाजपचं संख्याबळ पाहता त्यांचे दोन उमेदवार सहज विजयी होतील. त्यानंतरही त्यांच्याकडे २२ मतं शिल्लक राहतील. महाविकास आघाडी आणि भाजपनं त्यांची अधिकची मतं संभाजीराजेंना दिल्यास ते विजयी होतील.