ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या सभांनंतरही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरची तोफ धडधडणारी ठेवली आहे. निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी विकासावर बोलायचे सोडून देशभक्ती, राजीव गांधी अशा भलत्याच विषयांवर बोलत असल्याची टीका त्यांनी केली. देशाचा पंतप्रधान सुशिक्षित असण्याबरोबर सुज्ञही असायलाच हवा असे ठाकरे यांनी सांगितले.
मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळ, मराठा आरक्षण, नरेंद्र मोदींचे ढगाळ वातावरणाचे वक्तव्य आणि आंब्याच्या स्टॉलला तोडल्याविरोधात सडकून टीका केली.
यंदाची निवडणूक विकासाच्या मुद्दयावर चाललेली नसल्याकडे लक्ष वेधताना ती 'देशभक्त विरुद्ध गालीभक्त' या मुद्द्यावर रंगविली जात आहे. या प्रश्नावर ठाकरे यांनी हे त्यांनी ठरवायचं नाही, नरेंद्र मोदी म्हणजे देश नव्हे. देशभक्तीची सर्टिफिकेट तुम्ही नाही वाटायची. नवाज शरीफला जाऊन केक भरवायचा होता तेव्हा देशभक्त आणि देशद्रोही ठरवायचं होतं, असा टोला राज यांनी हाणला.
हिंदू दहशतवादाच्या प्रश्नावर त्यांनी हा जुना शब्द आहे. दहशतवादी हा दहशतवादीच, त्याचा धर्म नसतो. दहशतवादाला तिथल्या तिथे ठेचणं गरजेचं आहे. अमेरिकेनं ते केलं आणि नंतर इतक्या वर्षांत त्यांच्याकडे काहीही घडलेलं नसल्याचीही त्यांनी आठवण करून दिली. नरेंद्र मोदींनी जी स्वप्नं देशाला दाखवली होती, त्याच्यावर ते का बोलत नाहीत, याचं उत्तर मिळालं पाहिजे. या निवडणुकीचा राजीव गांधींशी काय संबंध, पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांचा काय संबंध असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या सरकारकडून जातीय, धार्मिक ध्रुवीकरण केले जात आहे. लोक शहाणे आहेत. आपल्याला वाटत की त्यांना काही समजत नाही. पण त्यांना सगळं समजत असतं, असेही राज म्हणाले. मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात जाणारच होता. आरक्षण मिळू शकत नव्हतं, यामुळे समाजाला सरकार फसवणारच होतं, एवढी वर्षे महाराष्ट्रातल्या-देशातल्या तरुणांशी खेळ करत बसलात का तुम्ही, असा सवाल विचारत त्यांनी विद्यार्थ्यांना भेटणार असल्याचे राज यांनी सांगितले.
साध्वी प्रज्ञासिंहांवर वक्तव्यसाध्वी प्रज्ञासिंह या काय बोलतात त्याचे हे सरकार समर्थन करते आणि त्यांना तिकीट देते. लाजा वाटल्या पाहिजेत. अमित शहा यांनी पंतप्रधान किती शिकले याचे सर्टिफिकेट दाखविले होते. पण आम्ही कोणीच विचारले नव्हते. पंतप्रधान सुशिक्षित आहे का हे विचारलं नव्हतं तो सुज्ञ असावा ही अपेक्षा होती. राज्यकर्ते सुज्ञ असावेत हीच अपेक्षा असते असा टोलाही राज यांनी लगावला.