नागपूरः माफी मागायला मी काही सावरकर नाही, राहुल गांधींनी असं म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधींच्या या विधानावरून आता भाजपानं त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींच्या या विधानावरून शिवसेनेनंही आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही राहुल गांधींना कडक शब्दांत इशारा दिला आहे. वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्याप्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. जय हिंद,', असं म्हटलं आहे.तसेच 'आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे,' अशा शब्दांमध्ये त्यांनी राहुल गांधींवर नाव न घेता दुसऱ्यांदा ट्विट करून टीकास्त्र सोडलं. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही सावरकरांबद्दल भूमिका स्पष्ट केलेली आहे. सावरकरांबाबत आमची भावना होती ती आहे, कालही होती, आजही आहे, उद्याही तशीच राहेल, त्यात काही फरक पडणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीचं वाद उद्धभवण्याची शक्यता आहे.
सावरकरांबाबत आमची भूमिका स्पष्ट, त्यात कोणताही बदल नाही- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 7:19 PM