मुंबई : राजधानी, शताब्दी व दुरोन्तो एक्सप्रेसचे भाडे ९ सप्टेंबरपासून मागणी व पुरवठा या तत्त्वावर ‘डायनॅमिक फेयर’ पध्दतीने आकारण्यात येत आहे. त्यावर सर्व बाजूंनी टीका झाल्याने अखेर ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात येत असल्याचा खुलासा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. विमान आणि बसपेक्षा या तीन्ही ट्रेनचे भाडे स्वस्त असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. रेल्वे एकूण १२,५00 ट्रेन चालवते. यात ३,२00 मेल-एक्सप्रेसपैकी १४२ ट्रेन या उच्च श्रेणीच्या आहेत. यात डायनॅमिक भाडे पध्दतीने रेल्वेने उच्च श्रेणीच्या दरांत वाढ केली असून कनिष्ठ व सर्वसामान्य प्रवाशांना भाडेवाढीचा फटका बसणार नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने नमूद केले आहे. रेल्वे दर किलोमीटर व दर प्रवाशामागे ७३ पैसे खर्च करते. त्याबदल्यात केवळ ३७ पैसे उत्पन्न मिळते. रेल्वेला कोचिंग सेवेमागे ३३ हजार ४९0 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. प्रवासी खर्चापैकी केवळ ५६ टक्केच वसूल करणे शक्य होत आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी आणि उत्पन्न मिळवण्यासाठी म्हणून राजधानी, शताब्दी व दुरोन्तो एक्सप्रेसमध्ये हवाई सेवेतील तिकीट प्रणालीप्रमाणे डायनॅमिक भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा विमान, बस सेवेपेक्षा स्वस्त असल्याचा दावा रेल्वेने केला. दिल्ली ते मुंबई विमान प्रवास भाडे २,६0८ ते ७,५५२ रुपये असून रेल्वेच्या सेकंड क्लास एसीचे भाडे जवळपास २,८७0 ते ४,१0८ रुपये आहे. त्याचप्रमाणे दिल्ली कोलकाताचे विमान भाडे हे ५,८५६ रुपये ते २0,0६0 रुपये असून रेल्वेच्या सेकंड क्लास एसीचे भाडे हे २,८९0 ते ४,२३२ आणि थर्ड एसीचे भाडे २,0८५ ते २,९८१ रुपये आहे. दिल्ली ते चेन्नईचे रेल्वे प्रवास भाडेही कमी असल्याचा दावा रेल्वेने केला आहे.
इतरांपेक्षा आमची सेवा स्वस्त
By admin | Published: September 13, 2016 5:09 AM