जगभरात प्रेमदिवस म्हणून साजरा होणाऱ्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने होणारी उलाढाल यंदा ३० हजार कोटींच्या घरात जाईल, असा द असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स आॅफ इंडियाने अंदाज व्यक्त केला आहे. या दिवसाची लोकप्रियता वाढतच चालली आहे; आता ‘व्हॅलेंटाइन वीक’ साजरा होत असल्याने यंदा मार्केटचा आलेख वाढतच जाणार आहे.पाश्चात्त्य संस्कृतीत साजऱ्या करण्यात येणाऱ्या ‘व्हॅलेंटाइन डे’चा ज्वर भारतातही झपाट्याने चढला आहे. प्रत्येक जण भेटवस्तू देऊन प्रिय व्यक्तीला मनातील भावना सांगतो. तरुणाईने महिनाभरापासूनच यासाठी तयारी सुरू केली होती. महत्त्वाचे म्हणजे, असोचेमने केलेल्या या सर्वेक्षणानुसार, पुरुषांच्या तुलनेत व्हॅलेंटाइन डेचे महिलांचे बजेट अधिक असल्याचे दिसून आले आहे.असोचेमच्या २०१४ सालच्या सर्वेक्षणानुसार, व्हॅलेंटाइननिमित्त १६ हजार कोटींच्या घरात उलाढाल झाली होती. यात ४ कोटी ग्राहकांनी आॅनलाइन शॉपिंगला पसंती दर्शविली होती. तर २०१५ साली ६ कोटी ५० लाख व्यक्तींनी आॅनलाइन शॉपिंगचा फंडा आजमावला होता. असोचेमने २०१५ साली केलेल्या सर्वेक्षणानुसार, व्हॅलेंटाइनचे मार्केट २२ हजार कोटींच्या घरात पोहोचले होते. यासाठी असोचेमने अशा भेटवस्तू बनविणाऱ्या ६०० कंपन्यांकडून माहिती गोळा केली होती. त्यात आॅनलाइन शॉपिंगचाही समावेश होता.व्हॅलेंटाइनच्या निमित्ताने अनेक प्रकारच्या भेटवस्तू दिल्या जातात. त्यात फुले, चॉकलेट्स, खेळणी, विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा समावेश असतो. इतकेच नव्हे, तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांनीही खास योजना जाहीर केल्या आहेत. आॅनलाइन मार्केट तेजीत असल्याने ग्राहकांनी हाच पर्याय स्वीकारणे पसंत केले आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांची चंगळ असून केरळ, गोवा, नैनिताल, माऊंट अबू, शिमला, जयपूर अशा ठिकाणांना पर्यटनासाठी पसंती मिळत आहे.
उलाढाल कोटींच्या घरात !
By admin | Published: February 13, 2016 10:30 PM