अविनाश साबापुरे / यवतमाळ राज्यभरातील शाळांनी यू-डायसमध्ये नोंदविलेल्या आणि जनगणनेतील विद्यार्थी संख्येत प्रचंड तफावत आहे. या आकडेवारींची तुलना केल्यास महाराष्ट्रातील तब्बल सव्वाचार लाख मुले कोणत्याही शाळेच्या पटावर नाहीत. त्यामुळे दोन महिन्यांत या शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी दिले आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली.यू-डायस प्रणाली अद्ययावत केल्यानुसार राज्यभरातील शाळांमध्ये ६ ते १४ वयोगटातील १ कोटी ६० लाख विद्यार्थी शिकत आहेत. मात्र, २०११च्या जनगणनेत आढळलेल्या, परंतु कोणत्याही शाळेच्या यू-डायसमध्ये नसलेल्या मुलांची संख्या तब्बल ४ लाख २१ हजार २७४ आहे. त्यामुळे ही मुले शाळाबाह्य आहेत की, शिक्षण विभागाच्या सरल, यू-डायस या संगणकीय प्रणालीत त्यांची योग्य नोंद झाली नाही, याचा शोध शिक्षण विभाग घेत आहे. तूर्त या सर्व विद्यार्थ्यांना शाळाबाह्य मानून त्यांना शोधून काढण्याचे आदेश प्रधान सचिव नंदकुमार यांनी दिले आहेत. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोनच महिन्यांत ४ लाख २० हजार विद्यार्थी शोधण्याचे शिवधनुष्य शिक्षकांना उचलावे लागणार आहे.
राज्यात सव्वाचार लाख शाळाबाह्य विद्यार्थी
By admin | Published: December 24, 2016 4:30 AM