मुंबई : एसटी महामंडळाकडून निलंबित एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरूच आहे. मंगळवारी १४८ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून, आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ५६३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत महामंडळाने १०,७३१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, त्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आतापर्यंत एकूण २३५५१ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. दोन महिने होऊन सुद्धा एसटीचा संप सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. महामंडळाने आतापर्यत राेजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून, १०,७३१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तर २,७९६ कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहेत. मात्र, निलंबनाच्या कारवाईनंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. निलंबित कामगारांना आतापर्यंत मंडळाकडून दोन वेळा संधी देण्यात आलेली होती. मात्र, संधी देऊन सुद्धा निलंबित कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यास सुरुवात केली आहे.
निलंबित एसटी कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ५६३ जण बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 7:48 AM