मुंबई : जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास आठ-दहा वर्षे रखडविणाऱ्या विकासकांना निलंबित करीत घरचा रस्ता दाखविला जाईल. संबंधित सोसायटी व म्हाडाला नवीन विकासक नेमण्याची संधी देण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी आज विधानसभेत केली.मुंबईतील इमारत दुरुस्ती मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व विषयांबाबत आमदारांची समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीमार्फत राज्य सरकारला लवकरच सूचना प्राप्त होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत अर्धा तासाची चर्चा शिवसेनेचे अजय चौधरी यांनी उपस्थित केली होती. या इमारतींचा पुनर्विकास अनेक वर्षे रखडला आहे. रहिवाशांची राहण्याची पर्यायी व्यवस्था न करता त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. मुदतीत काम न करणाऱ्या विकासकांवर कुठली कारवाई करणार, असा प्रश्न चौधरी यांनी केला. काम रखडविणाऱ्या विकासकाला निलंबित करण्याबरोबरच नवीन विकासक नेमण्याची मुभा दिली जाईल. म्हाडाची जबाबदारी ही केवळ एनओसी देण्यापुरती न ठेवता इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यापर्यंतची असेल, असे मेहता यांनी स्पष्ट केले. जुन्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी अपुरा आहे. तो वाढविण्याचा प्रयत्न असेल. इमारत दुरुस्ती मंडळाबाबत आठ आमदारांची समिती नेमण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात समितीची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मेहता यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)
पुनर्विकास रखडवणाऱ्या विकासकांना बाहेरचा रस्ता
By admin | Published: March 23, 2017 11:42 PM