ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 28 - पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेला ‘ये दिल है मुश्कील’ हा चित्रपट राष्ट्रप्रेमी नागरिकांनी बघू नये असे आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी गांधीगिरी करत आंदोलन केले. चित्रपट बघून येणाऱ्यांना गुलाबपुष्प देण्यात आले. तसेच चित्रपटाचे पोस्टरही जाळण्यात येऊन निषेध नोंदविण्यात आला.शहरातील ज्योती चित्रमंदिरात पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेला ‘ये दिल है मुश्कील’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याचा निषेध नोंदवित सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली चित्रपट गृहाबाहेर गांधीगिरी करत आंदोलन छेडण्यात आले.या आंदोलनात सभागृह नेते कमलेश देवरे, नगरसेवक संदिप पाटोळे, उपाध्यक्ष अरुण पवार, ललित कोरके, भगवान चौधरी, गुलशन उदासी, प्रवक्ता रजनीश निंबाळकर, राजू बोरसे, संजय वाल्हे, बाळू आगलावे, नैनेश साळुंखे, सचिव समाधान शेलार, कुणाल पवार, निलेश गवळी, बबलू शेख, विद्यार्थी अध्यक्ष सचिन आखाडे, साई शेख, आशिषसिंग चौव्हाण, महिला ग्रामीण अध्यक्षा ज्योती पावरा, राहूल गायकवाड, वाल्मिक जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष सत्यजित सिसोदे, शहर अध्यक्ष कांतीलाल दाळवाले, जयदिप काकडे, असिफ शहा, अशपाक मणियार, सनी मोरे, सुयोग मोरे, भरत सोनावणे, मेघश्याम पाटील सहभागी झाले होते.आंदोलनानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हा चित्रपट न पाहण्याचे आवाहन राष्ट्रपे्रमी नागरीकांना केले आहे़ देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर २४ तास पहारा देत संरक्षण देणाऱ्या भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करुन छुपे युध्द करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेला सिनेमा पाहणे चुकीचे आहे़ भारतीय नागरीकांनी या सिनेमाचा निषेध करुन हा चित्रपट प्लॉप करण्यासाठी पुढे यावे.आज राज्यात अनेक प्रश्न आहेत. शेतकरी आत्महत्यासह शेतीमालाला योग्य भाव नसणे, बेरोजगारांचा प्रश्न न सुटणे, विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न, आरक्षणाचा विषय सुटलेला नाही, महिलांचे संरक्षण होत नाही अशा प्रकारचे विविध प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सोडविणे अपेक्षित आहे़ मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांकडे पाहण्याची गरज आहे़ यापुढे असले प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीही खपवून घेणार नाही असा इशारा मनोज मोरे यांनी दिला आहे़ >‘ये दिल है मुश्कील’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे़ आंदोलनामुळे या चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी झाली आहे़ मोजकेच जण असलेतरी त्यात तरुण सर्वाधिक आहे़ आंदोलनावेळी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता़ आता तशी शांतता आहे़ - दिनेश माळीमालक, ज्योती चित्रमंदिर
चित्रपटगृहाबाहेर राष्ट्रवादीची गांधीगिरी
By admin | Published: October 28, 2016 5:40 PM