औरंगाबाद/मुंबई : ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे मराठवाड्यासह राज्याच्या काही भागांत अतिवृष्टीने दाणादाण उडविली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पूरपरिस्थिती कायम होती. अतिवृष्टी, तसेच पुरामुळे राज्यात लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. मराठवाड्यात तर पिकांची माती झाल्याची स्थिती आहे. निसर्गाच्या या तडाख्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हतबल झाला आहे. शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
मराठवाड्यात अनेक ठिकाणी कपाशीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी कापूस उत्पादनाला फटका बसला आहे. तीन वर्षांपासून कपाशीला अतिवृष्टीचा फटका बसत आहे. काही प्रमाणात कडधान्यांची पिकेदेखील अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. ५० लाख हेक्टर पेरण्यांच्या तुलनेत ५० टक्के खरीप हंगाम बाधित होण्याचा अंदाज आहे. २८ सप्टेंबरपर्यंत लातूर व उस्मानाबाद जिल्हे नुकसानीच्या यादीत नव्हते. परंतु २८ रोजी झालेल्या पावसामुळे या जिल्ह्यातही नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री दौरा करणार पूर परिस्थिती ओसरताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याचा दौरा करतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी येथे सांगितले. गेल्या दोन दिवसांतील अतिवृष्टीने मराठवाड्यातील ११ लाख हेक्टरवरील पिकांचे तर राज्याच्या अन्य भागात ६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे ते म्हणाले. राज्यातील किती जिल्हे अतिवृष्टीग्रस्त आहेत, प्रत्यक्ष नुकसान किती झालेले आहे, याची माहिती युद्धपातळीवर गोळा केली जात आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करायचा, याबाबतचा निर्णय शासन घेईल. केंद्र सरकारने अतिवृष्टीसाठी राज्याला मदत करावी, यासाठी वारंवार पाठपुरावा केला जातो. पण प्रतिसाद मिळत नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावरऔरंगाबाद : मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. खरीप हंगामातील ५० टक्के पीकक्षेत्राचा चिखल झाल्याची प्राथमिक माहिती असून, अंदाजे सात ते आठ हजार कोटी मदतीसाठी लागण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे मराठवाडा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी बुधवारी चर्चा केली. विभागीय पातळीवर सर्व जिल्ह्यांतून नुकसान आणि संभाव्य लागणाऱ्या मदतीचा आढावा घेतला जात आहे. आता ३० लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सोयाबीन वाळून काढणीवर आले आहे. सतत पावसामुळे बहुतांश ठिकाणचे सोयाबीन काढलेले नसल्याने ५० टक्के उत्पादनावर परिणाम होणार आहे.
उत्तर महाराष्ट्र : नाशिकला अतिवृष्टीमुळे कांदा, बाजरी, मका, सोयाबीन पिकांना पावसाचा फटका बसला, तर अतिपावसाने जमिनी खरवडल्या आहेत. शेतात सोंगून ठेवलेला मका, सोयाबीन भिजले आहे. मालेगाव तालुक्यात डाळिंब बागा पाण्याखाली गेल्या. कांदा पिकात पाणी जाऊन पात पिवळी पडली आहे. भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात गिरणा परिसरात अनेक शेतांमध्ये पाणी शिरले आहे. ते अजूनही साचून आहे.
विदर्भ : अकाेला जिल्ह्यात ४० हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस मातीमोल झाला आहे. काढणीला आलेल्या मालाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कपाशीची बोंडे काळी पडत आहेत. शेतात पाणी कायम आहे.
प. महाराष्ट्र: सोलापूर जिल्ह्यात उडीद, सोयाबीनचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, करमाळा, सांगोला, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.
‘धीर सोडू नका, सरकार तुमच्या पाठीशी’मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली. मात्र, आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पंचनामे होऊन मदत दिली जाईलच; पण तातडीची मदत पोहोचविण्याचे काम तत्काळ सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रशासनाला दिले.
मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून जिल्हानिहाय आढावा घेतला. कोणत्याही स्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने सर्वतोपरी मदत पोहोचवावी, असे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशीही चर्चा केली असून, आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे, तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा, असे सांगितले.