मुंबई : संरक्षण दल आणि कामगार योजनेसाठी असलेली औषधे खुल्या बाजारात विकल्याप्रकरणी एफडीएने राज्यभरात १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यातून ४० लाखांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.औषधांच्या लेबलवरील ‘फॉर डिफेन्स सप्लाय नॉट फॉर सेल, ईएसआय सप्लाय नॉट फॉर सेल’ अशा प्रकारचा मजकूर खोडून किंवा मिटवून खुल्या बाजारात विक्री होत असल्याचे निदर्शनास आले होते. यावर एफडीए प्रशासनाने मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यात कारवाईचे सत्र सुरू केले. आतापर्यंत प्रशासनाने विविध धाडींमधून ४० लाख रुपये किमतीचा औषध साठा जप्त करत १३ जणांवर एफआयआर दाखल केले.३० जानेवारी रोजी भायखळा येथील मे. निवान फार्मास्युटिकल्स याच्याकडे अशी खाडाखोड केलेली औषधे विक्रीसाठी आल्याची गुप्त माहिती एफडीएला मिळाली होती. या वेळी निवान फार्मास्युटिकल्सवर छापा टाकून १३ लाखांचा औषधसाठा जप्त करण्यात आला. तळोजातील मे. मेडलाईफ एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड येथून १६ लाखांचा औषध साठाही जप्त केला आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले की, सैन्य दल आणि राज्य कामगार विमा योजना, शासकीय रुग्णालय यांच्यासाठी वापरात असलेल्या औषधांचे स्टॅम्प खोडून खुल्या बाजारात विक्री सुरू होती, ही धक्कादायक बाब आहे. १३ जणांवर एफआयआर दाखल केले आहेत. प्रशासनाची पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी सखोल तपास केला आहे. या प्रकरणी मुंबईमध्ये दोन आणि रायगडमध्ये एक एफआयआर नोंदविण्यात आला आहे.यांच्यावर कारवाईनिवान फार्मास्युटिकल्सचा मालक विनिता लुनीया आणि निक्षित लुनीया, सेफ लाइफ एंटरप्रायझेस, मुलुंडचे संचालक दीपेश गाला व ध्रुव मेहता, मेडलाईफ प्रायव्हेट लिमिटेड, तळोजा या संस्थेचे संचालक प्रशांत सिंग, तुषार कुमार व सौरभ अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
मुंबई, ठाणे, पुण्यातून ४० लाखांचा औषधसाठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 1:34 AM