लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १ जुलैपासून लागू झालेल्या ‘जीएसटी’चा गैरफायदा घेत, काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करताना आढळून आले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी शासनाने यंत्रणा सुरू केली आहे. मात्र, आता काही नामांकित औषध कंपन्या राजरोसपणे अतिरिक्त दरांत औषधांची विक्री करत, ग्राहकांची लूट करत असल्याचे उघड झाले आहे. अशा बड्या नामांकित औषध कंपन्यांना नुकत्याच राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने नोटिसा बजाविल्या आहेत. राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाच्या नियमांचे काही औषध कंपन्या उल्लंघन करीत असल्याचे लक्षात आले होते. याविषयी, प्राधिकरणाने अधिक तपास केला असता, काही नामांकित औषध कंपन्या अतिरिक्त दर आकारत असल्याचे निदर्शनास आले. त्यात जीएसके, सनफार्मा, टोरंट, सिप्ला, किवी लॅब्स, एबॉट हेल्थकेअर, डॉ.रेड्डी लॅबोरेटरी, इंटास, न्यूटेक हेल्थकेअर, ल्यूपिन अशा विविध बड्या कंपन्यांना या प्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे. प्राधिकरणाने केलेल्या तपासात या कंपन्या हजारो ते लाखो रुपयांपर्यंत अतिरिक्त दर आकारत होते.
जादा दर घेणाऱ्या औषध कंपन्या आता रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 2:35 AM