जमीर काझी, मुंबईमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) पोलीस खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी बसलेल्या ‘ओव्हर एज’(वाढीव वय) उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. आता हे उमेदवार देखील आयपीएस परीक्षा देण्यास पात्र ठरणार आहेत. महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाचे (मॅट) न्यायिक सदस्य बी. पी. मलिक यांनी बुधवारी पात्र ठरवत अंतरिम निकाल दिला. त्यामुळे पोलीस दलातील दोन हजारांवर इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. एमपीएससीतर्फे येत्या २१ आॅगस्टला ही परीक्षा होणार आहे. उपनिरीक्षकांच्या ८२८ पदांसाठी मुंबईसह राज्यातील सात केंद्रावर परीक्षा होणार आहे. त्यासाठी राज्यभरातून सुमारे २५ हजारांवर अर्ज आल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले. त्यापैकी दीड हजारांहून आधिक उमेदवारांचे वय हे आयोगाने निश्चित केलेल्या मर्यादेहून अधिक आहे. २०१३ व २०१४ या वर्षात ‘डिपार्टमेंटल’ परीक्षाच न झाल्याने त्यांना परीक्षेला बसण्याची संधी दिली पाहिजे, असे मलिक यांनी निकालात स्पष्ट केले आहे. त्यासाठी पाच उमेदवारांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. आता खुल्या प्रवर्गातील ३८ व मागासवर्गीय प्रवर्गातील ४३ वर्षांपर्यंतचे वयाचे उमेदवार परीक्षा देऊ शकतील.कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात भरती झालेल्या अनेकांची अधिकारी बनण्याची इच्छा असते. त्यासाठी २५ टक्के पदे खात्यांतर्गत एमपीएससी मार्फत परीक्षा घेऊन भरली जातात. त्यासाठी पदवीधर कॉन्स्टेबल पदासाठी ४ वर्षे सेवा व बारावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी ५ वर्षे सेवा पूर्ण असणे ही प्रमुख अट आहे. त्याचप्रमाणे वय ३५ वर्षांच्या आत असणे गरजेचे असते. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सवलत देण्यात येते. मात्र दरवर्षी परीक्षा होणे अपेक्षित असताना आयोगाने २०१३ व २०१४ या वर्षांत परीक्षाच घेतलेली नव्हती. त्यामुळे इच्छुकांना वयाबाबत शिथिलता द्यावी, अशी मागणी होती. ‘मॅट’ने ती ग्राह्य धरुन अंतरिम निकाल दिला आहे. कोणीही इच्छुक वयाच्या कारणामुळे डावलला जाऊ नये, याबाबत आयोगाने दक्षता घ्यावी, अशी सूचना मलिक यांनी केली आहे. आॅनलाइन अर्ज आणि असंतोष...एमपीएससीने या परीक्षेसाठी २६ जूनला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सुरुवातीला ‘ओव्हर एज’ उमेदवारांचे ‘आॅनलाईन’ अर्ज स्वीकारले जात नव्हते. त्याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांतून असंतोष व्यक्त होवू लागल्यानंतर आयोगाने त्यांचा अॅक्सेस सुरु केला.संबंधित उमेदवारांनी कितीवेळा परीक्षा दिल्या आहेत, हे नमूद करण्यासाठी स्वतंत्र रकाना बनविण्यात आला. पूर्वीच्या नियमाप्रमाणे खुल्या गटातील उमेदवार ३५ वर्षांपर्यंत कितीही वेळा परीक्षा देवू शकत होता. आणि अखेरच्या तीन वर्षांत किमान तीन संधी मिळणे आवश्यक आहे, त्याच आधारावर आयोगाने हा निर्णय दिला आहे.
‘ओव्हर एज’ पोलीसही परीक्षेस पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2016 4:08 AM