मुंबई : राज्यभरातून आयटीआय प्रवेशासाठी शनिवारपर्यंत एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ५ हजार ४५६ असून, अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९४ हजार ३०३ आहे, तर त्यातील ९१ हजार १३२ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे.
या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज, नोंदणी शुल्क भरणे, पसंतीच्या ‘आयटीआय’ची निवड करणे, अर्जात दुरुस्ती व हरकती नोंदविण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. पहिल्या तीन फेरीत संस्था न मिळाल्यास पसंतीक्रमात बदल करता येईल. अन्यथा जुन्या पसंती क्रमानुसारच निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. समुपदेशन फेरीसाठी पात्र तसेच नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती व प्रवेश अर्ज शुल्क जमा करण्यासाठी १२ जून ते ११ जुलै अशी मुदत आहे.
सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार प्रवेशराज्यातील ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ९५ हजार ३८० आणि ५७४ खासगी आयटीआयमध्ये ५९ हजार १२ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश असून, मुलींसाठी एकूण ५३ हजार ६०० जागा राखीव मिळणार आहे. या प्रवेशप्रक्रियेचे १ सप्टेंबरपर्यंत प्रवेशाचे टप्पे पूर्ण होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.