-ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.11- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाढते अपघात व वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी सुरु आहे. आता महामार्ग पोलिसांनी ‘गोल्डन अवर्स’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. वीकेंड आणि सुट्ट्यांच्या वेळी एक्स्प्रेस वेवर ‘गोल्डन अवर्स’ योजना राबवण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत ठरावीक तासांसाठी अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असणार आहे. शनिवारी आणि रविवारी एक्सप्रेस-वेवर वाहनांची संख्या जास्त असते त्यामुळे या योजनेचा वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी फायदा होईल असे सांगितले जात आहे.महामार्ग पोलिसांनी शनिवारपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे.
या आधी एक्सप्रेस वे वर ड्रोन विमानाचा व सीसीटीव्हीचा प्रयोग करण्यात आला आहे. या चाचण्यांमधून ड्रोनच्या तुलनेत सीसीटीव्ही अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे.या नियमाची महामार्ग पोलिसांनी आजपासूनच अंमलबजावणी सुरु केली आहे