उस्मानाबाद : जिल्ह्यातील भूम, परंडा व तुळजापूर तालुका व परिसरात रविवारी सायंकाळी दमदार पाऊस झाला़ विशेषत: परंडा तालुक्यातील सोनारी येथे ७० मिमी, आसू येथे ६४ मिमी, भूम तालुक्यातील ईट येथे ६६ मिमी पाऊस झाला़ सोनारी, आसू, ईट परिसरात अतिवृष्टी झाल्याने या भागातील कोरडेठाक पडलेले नदी-नाले पाण्याने भरून वाहिली़ तर तुळजापूर तालुक्यातील जळकोट शिवारात ५५ मिमी पाऊस झाला़ दरम्यान, उस्मानाबाद तालुका व परिसरात अद्याप अपेक्षित पाऊस झाला नसून, भूरभूर पावसावर निर्माण झालेल्या ओलीवरच अनेकांनी पेरणी सुरू केली आहे़ तर उर्वरित तालुक्यातील खरीप पेरणीचा वेग वाढला आहे़ मागील वर्षी पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि उन्हाचा पारा ४४ अंशाच्या पुढे गेल्याने वाढलेला उकाडा यामुळे जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले आहेत़ जूनच्या प्रारंभीपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे़ जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला़ परंडा मंडळात ५४ मिमी, जवळा ३०, आनाळा ५०, सोनारी ७०, तर आसू मंडळात ६५ मिमी पाऊस झाला़ वाशी तालुक्यातील वाशी मंडळात १२ मिमी, तेरखेडा ९ तर पारगाव मंडळात १२ मिमी पाऊस झाला़ भूम तालुक्यातील भूम मंडळात २३ मिमी, ईट मंडळात ६६ मिमी, अंबी मंडळात ४६ मिमी, माणकेश्वर मंडळात २५ मिमी तर वालवड मंडळात ३० मिमी पाऊस झाला़ कळंब तालुक्या केवळ कळंब (७ मिमी) व येरमाळा मंडळात ४ मिमी पाऊस झाला़ तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर मंडळात ७, सावरगाव ४, जळकोट ५५, नळदुर्ग २६, मंगरूळ २०, सलगरा ३८ मिमी पाऊस झाला़ उमरगा तालुक्यातील उमरगा मंडळात १ मिमी, मुरूम १० मिमी पाऊस झाला़ लोहारा तालुक्यातील केवळ जेवळी मंडळात ८ मिमी पावसाची नोंद झाली़ उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद मंडळात ८ मिमी, तेर २ मिमी, बेंबळी ३ मिमी, तर केशेगाव मंडळात २ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ (प्रतिनिधी) १४ मंडळात पावसाचा थेंब नाहीजिल्ह्यातील ४२ महसूल मंडळापैकी तब्बल १४ मंडळात रविवारी पावसाचा थेंबही पडला नाही़ एकीकडे सोनारी, आसू, ईट आदी भागात अतीवृष्टी झाली असली तरी या भागात पाऊस नसल्याने निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव या भागातील नागरिकांना आला़ यात उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी, पाडोळी, जागजी, तुळजापूर तालुक्यातील इटकळ, उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, मुळज, दाळींब, लोहारा शहर, माकणी, कळंब तालुक्यातील इटकूर, शिराढोण, मोहा, गोविंदपूर या मंडळांचा समावेश आहे़
सोनारी, आसू, ईटमध्ये अतिवृष्टी
By admin | Published: June 13, 2016 11:31 PM