मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघ्या दोन महिन्यांचा काळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे एक-एक दिवस आमच्यासाठी महत्वाचा आहे. मात्र असे असतानाही वंचित बहुजन आघाडीकडून जागावाटप बाबत कोणताही खुलासा केला जात नसल्याने आमची चिंता वाढत असल्याचे एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील म्हणाले होते. मात्र यावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा केला आहे. 26 ऑगस्टला मी हैदराबादला जाणार असून त्या दिवशी जागावाटपावर निर्णय घेतला जाणार असल्याचे आंबेडकर म्हणाले आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. मात्र एमआयएमला किती जागा सोडायच्या यावर अजूनही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे वंचित आघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा पहायला मिळत होती. मात्र आता वंचित आणि एमआयएम यांच्यातील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार आहे. विशेष म्हणजे खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपाच्या निर्णयाची तारीख सुद्धा सांगितली आहे.
26 ऑगस्टला मी हैदराबादला जाणार असून त्या दिवशी जागावाटपावर निर्णय घेतला जाणार असल्याचे आंबेडकर म्हणाले आहे. त्याच बरोबर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले. त्याच बरोबर आम आदमी पक्षासोबतही बैठक होणार असून त्यांनाही वंचितमध्ये सामावून घेतलं जाणार असल्याची माहितीही प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
एकीकडे वंचित आणि एमआयएम यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटण्याचे चिन्ह आहेत. तर दुसरीकडे मात्र काँग्रेस आणि वंचित यांच्यातील जागावाटपाच पेच कायम आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी काँग्रेसला 144 जागांची ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर काँग्रेस स्वीकारण्याची शक्यता नाही. त्यामुळे लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.