मुंबई - विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला असताना, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात युती होणार नसल्याचा खुलासा खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसिध्दी पत्रक काढून केला होता. मात्र जोपर्यंत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी सांगत नाहीत तोपर्यंत युती कायम असल्याचा खुलासा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. मात्र आता यावर असदुद्दीन ओवेसी यांनी खुलासा करत, जलील यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाचा अधिकृत निर्णय असल्याचा जाहीर केले आहे. ते पत्रकार परिषेदत बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं जलील यांनी जाहीर केले होते. त्यातच आता ओवेसी यांनी सुद्धा युती तुटली असल्याचा खुलासा केला आहे. जलील हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असून, त्यांच्याच निर्णय अंतिम राहील असे सांगत ओवेसी यांनी वंचितमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले. एक प्रकारे ओवेसीनी आंबेडकर यांना धक्काच दिला आहे.
ओवेसी हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत युती कायम असणार असल्याचा दावा वंचितकडून करण्यात आला होता. मात्र आता ओवेसी यांनी जलील यांचा निर्णय अंतिम असल्याचे सांगितल्याने वंचित आणि एमआयएम यांची युती तुटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यावर आता प्रकाश आंबेडकर हे काय प्रतिकिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.