ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - मालकाची तीस लाखाची एसयूव्ही फॉर्च्युनर गाडी चोरुन खासगी टॅक्सीमध्ये बदलणा-या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. महेश जिवाच असे आरोपीचे नाव असून, ११ जूनला त्याने पंचतारांकित हॉटेलमधून गाडीची चोरी केली. ठाण्याचे रहिवासी संदीप गोम्स (३५) यांच्याकडे महेश ड्रायव्हर म्हणून काम करायचा.
संदीप गोम्स पंचतारांकित हॉटेलमध्ये जीम इन्स्ट्रक्टरचे काम करतात. पाहुण्याची ने-आण करण्यासाठी गाडी ते हॉटेलमध्ये ठेवायचे. ११ जूनला महेश हॉटेलमधून गाडी घेऊन गेला. त्यानंतर गोम्स यांनी दुस-यादिवशी संर्पक साधण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन स्विचऑफ येत होता.
त्यामुळे गोम्स यांचा संशय बळावला व त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. महेशला बहिणीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. म्हणून त्याने गाडी चोरली. त्याने अलहाबाद आणि बिहारमध्ये गाडी विकण्याचा प्रयत्न केला. पण त्याला गाडी विकणे जमले नाही. त्यानंतर अलहाबादमध्ये त्याने एसयूव्हीला टॅक्सीमध्ये बदलले.
आपला माग काढू नये म्हणून महेशने त्याचे ओरिजन सीमकार्ड नष्ट केले व अलहाबादमध्ये नवीन सीम घेतले. पण आयएमईआय नंबरवरुन पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले. सहार पोलिस गाडी घेऊन मुंबईत आले आहेत. महेशला महिना १७ हजार रुपये पगार मिळत होता.