चंद्रकांत कित्तुरे - कोल्हापूर : कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची संजीवनी देण्याचा निर्णय राज्यातील सुमारे २५ साखर कारखान्यांनी घेतला आहे. त्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू असून, ६०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची आयात करण्यात येत आहे. देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्णसंख्या वाढत असताना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता होत नसल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याचे आदेश दिले होते.
३ प्रकारे ऑक्सिजननिर्मिती- सध्याच्या इथेनॉल प्रकल्पात सुधारणा करून ऑक्सिजन निर्मिती, स्किड माऊंटेड ऑक्सिजन प्लांट उभारणे, कान्सन्ट्रेटरची आयात करणे, यावर भर दिला होता. - दुसरा व तिसरा पर्याय बहुंताश कारखान्यांनी स्वीकारला. उस्मानाबादच्या धाराशीव साखर कारखान्याने पहिला पर्याय स्वीकारून इथेनॉल प्रकल्पात आवश्यक सुधारणा केल्या. यातून १३ मे रोजी ऑक्सिजननिर्मिती सुरू होणार आहे.- बारामती ॲग्रो युनिट १, उस्मानाबाद येथील नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रिज लिमिटेड, कोल्हापुरातील दत्त दालमिया कारखान्यातून मे अखेर किंवा जूनमध्ये गॅसनिर्मिती सुरू होईल.
दररोज १०० सिलिंडरचे उत्पादन -स्किड माउंटेड प्लांटचा उभारणी खर्च सुमारे ५० लाख रुपये आहे. त्याची क्षमता २५ ते ३० घनमीटर प्रति तास असून, दररोज ९० ते १०० ऑक्सिजन सिलिंडर भरले जातील. जवळपासच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांना माफक दरात ते पुरविले जातील.
प्रत्येक साखर कारखान्याने किमान एक ऑक्सिजन प्लांट आणि २५ कॉन्सन्ट्रेटर खरेदी करून कोरोना रुग्णांना संजीवनी द्यावी. - बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, विस्मा
कोरोना महामारीनंतरही हे प्रकल्प उत्पन्नाचा एक अतिरिक्त स्रोत म्हणून कार्यरत राहतील. कारखान्याची गरज भागवून उर्वरित ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी पुरवता येईल. - संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ.