मुंबई: संपूर्ण देशभरात दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाचे संकट गहिरे होत असताना रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात चणचण भासू लागली आहे. परिणामी कोरोनाबाधिता रूग्णांचे हाल सुरू आहेत. तर ऑक्सिजनअभावी काही रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील ठाकरे सरकार विविध उपाययोजना करत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भरून निघण्यासाठी केंद्राला साकडे घातले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना केलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला करण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (devendra fadnavis claims maharashtra got allotment of 1784 mt oxygen supply)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. तसेच या ट्विटसह तपशील मांडणारे दोन फोटोही शेअर केले आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेकानेक आभार. महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी
महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अतिशय आभारी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बीपीसीएलने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेडस येथे उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील. बीपीसीएलचे संचालक अरुणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी राज्य सरकारने कम्प्रेसरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजन सिलेंडर्स भरून देण्याची सुद्धा तयारी दर्शविली आहे. यामुळे सुद्धा मोठा दिलासा महाराष्ट्राला मिळेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा
केंद्रातील मोदी सरकारकडून महत्वाचा निर्णय
दुसरीकडे, देशभरात जिल्हा मुख्यालय स्तरावर ५५१ वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी पीएम केअर्स फंडातून निधी उपलब्ध केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर
दरम्यान, शनिवारी राज्यात ६७,१६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर तब्बल ६३,८१८ जणांनी कोरोनावर मात केली असून, दुसरीकडे मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८२.०२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली असून, तब्बल २,७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे.