मुंबई : आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळी यांची अखेर मंत्री कार्यालयातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांना त्यांच्या मूळ महसूल या विभागात परत पाठविण्यात आले आहे. माळी यांच्यावर आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात गंभीर आरोप वैद्यकीय अधिकारी राहुल घुले यांनी केले होते. जळगाव जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी महिलेने माळी यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू केलेले बेमुदत उपोषण कारवाईनंतर मागे घेतले.आरोग्य संचालक डॉ.मोहन जाधव यांनी आज उपोषणकर्त्या महिला अधिकाऱ्याची जी. टी. हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आणि उपोषण सोडण्याची विनंती केली. आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांची एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्या येत्या १० ते १५ दिवसांत अहवाल देणार आहेत. माळी यांना आधीच सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे, असे डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले. माळी आता मंत्री कार्यालयात नसतील त्यांच्या जागी नवीन अधिकारी येणार असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सूचित केले. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी महिलेने उपोषण सोडले. (विशेष प्रतिनिधी)
आरोग्य मंत्र्यांच्या पीएची हकालपट्टी!
By admin | Published: June 23, 2016 4:42 AM