नाशिक : गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस झालेला बेमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळे उद््ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत राज्य सरकारतर्फे सोमवारी हिवाळी अधिवेशनात विशेष पॅकेजची घोषणा केली जाईल, असा शब्द रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे सुतोवाचही त्यांनी केले.नाशिक जिल्ह्णातील मालेगाव, निफाड, दिंडोरी, चांदवड, बागलाणसह काही भागांत बेमोसमी पाऊस आणि गारपिटीने हजारो हेक्टरवरील द्राक्ष, डाळिंबासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रविवारी तातडीने नाशिक जिल्ह्णाचा दौरा केला. दिंडोरी तालुक्यात तळेगाव वणी आणि सोनजांब तसेच चांदवड तालुक्यातील शिंदवाड आणि वडनेर भैरव येथेत्यांनी शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांची पाहणी केली. कर्जमाफी झालीच पाहिजे या शेतकऱ्यांच्या मागणीवर अधिवेशनामुळे मला घोषणा करता येणार नाही. परंतु त्याबाबत अधिवेशनात निर्णय घेतला जाईल, असे सांगून त्यांनी कर्जमाफीचे सुतोवाच केले. शेतकऱ्यांच्या मागे कर्जफेडीसाठी तगादा लागू नये, तसेच पुढील हंगामात त्यांची कर्ज काढण्याइतपत पत निर्माण झाली पाहिजे याचा विचार करून सरकार निर्णय घेईल. नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा केली जाईल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी तत्कालिक मदत म्हणून सर्व प्रकारची कर वसुली थांबविली जाईल. वीजबिलांसाठी शेतकऱ्यांवर सक्ती केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे आदी दौऱ्यात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)> फळबागांसाठी असलेल्या पीकविमा योजनेतील अनेक निकष आणि अटींमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नाही. त्याचा विचार करून आता नव्या निकषांसह नवीन पीकविमा योजना आखण्यात येणार असून, लवकरच त्याची घोषणा केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.
गारपीटग्रस्तांसाठी आज पॅकेजची घोषणा
By admin | Published: December 15, 2014 3:49 AM