मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे आपल्या राजकीय विरोधकांवर चक्क गाडी घालायला लावली. ‘घाल रे त्यांच्या अंगावर गाडी’, असे पडळकर म्हणाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. नऊ जणांनी तशी साक्ष दिल्याची माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.
पडळकर यांच्या विरोधात आटपाडी तालुक्यात गंभीर स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहेत. बोगस लोक आणि खातेदार उभे करून देवस्थान मंदिरांच्या जमिनी हडप केल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी केली जाईल, असे देसाई यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्थेबाबत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना देसाई यांनी विरोधकांचे मुद्दे खोडून काढले.
पडळकर यांच्यावर हल्ला झाला, डंपर घालण्याचा प्रयत्न झाल्याचे विरोधकांनी म्हटले. त्यांच्यावर हल्ला झाला हे खरे आहे. पण त्याच्या आधी पडळकर यांनी विरोधकांच्या अंगावर गाडी घालायला लावली. पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद आणि सहकाऱ्यांनी विरोधकांना धमकावल्याचे रेकाॅर्ड मिळाले आहेत. पडळकर यांनी विरोधकावर गाडी घालायला लावल्यानंतर प्रतिक्रिया म्हणून जमाव जमला. घटनास्थळी असलेला डंपर हल्ल्यासाठीचा नसून रस्त्यावरून जाणारा होता, असे देसाई यांनी सांगितले.
आरोपांचा पाढागोपीचंद पडळकर यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न वगैरे सारखे १८ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगत देसाई यांनी ती यादीच सभागृहात वाचून दाखविली. भडक भाषा बोलणारे, गंभीर गुन्हे असलेले पडळकर मात्र सांगली, पुणे, साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी करीत असतात. हा सारा प्रकार चोराच्या उलट्या बोंबा असा आहे, असेही देसाई म्हणाले.
देवस्थानच्या जमिनी हडपल्याची चौकशीज्या आटपाडीत हे गुन्हे नोंद आहेत. तिथे देवस्थानच्या जमिनी हडप केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. सध्या संबंधितांचे नाव घेणार नाही. पण बोगस माणसे आणि खातेदार उभे करून जमिनी लाटल्या जात आहेत. या बोगस जमीन व्यवहारांची छाननी सुरू आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे ते वर्ग करून पुढील तपास करू, असेही देसाई यांनी सांगितले.