ऑनलाइन लोकमत/गणेश वासनिक
अमरावती, दि. 11 - कारागृह म्हटले की गुन्हेगारांचे स्वतंत्र गाव, असे चित्र समोर येते. मात्र, या गावातही कष्टकरी, श्रमकरी व शेती करण्याचे गुण अंगी असलेल्या व्यक्ती वास्तव्यास आहेत. परिणामी अमरावतीच्या काळ्या मातीत पहिल्यांदाच धान शेतीचा प्रयोग यशस्वी करण्याची किमया खुल्या कारागृहातील बंदीजनांनी केली आहे. तीन एकर परिसरात धानाचे भरघोस उत्पादन घेऊन ‘शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल’ असा संदेश बंदीजनांनी दिला आहे.विदर्भात धानशेती प्रामुख्याने गोंदिया, भंडारा, गडचिरोली आदी पूर्व भागातील जिल्ह्यांमध्ये केली जाते. अमरावती जिल्ह्यात धानशेतीसाठी योग्य जमीन व पोषक वातावरण नाही. त्यामुळे कोणताही शेतकरी धान शेती करण्याचे धाडस करीत नाही. मात्र, अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले यांच्या पुढाकाराने एचएमटी वाण धानाची रोपलागवड तीन एकरांत करण्यात आली. धानशेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींची पूर्तता बंद्यांच्या हातून करण्यात आली. धानशेतीसाठी पाणीपुरवठ्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. परिणामी ९० दिवसांत धानशेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. प्रतिएकर २० क्विंटल धानाचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धानशेतीच्या यशस्वी प्रयोगामुळे बंदीजनांना रोजगाराचे साधन उपलब्ध होण्याचे हे संकेत मानले जात आहेत. धानशेती करण्यासाठी खुल्या कारागृहातील २० कैद्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. कारागृहात सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत कैद्यांमध्ये माणूसपण रूजविताना त्यांच्यात समाजाप्रती आदर, सन्मान निर्माण करण्याचे कार्य कारागृह प्रशासनाला करावे लागते. इतकेच नव्हे तर बंद्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवावे लागतात. मागील काही महिन्यांपासून अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले यांनी बंदीजनांना रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. धानशेतीचा प्रयोग हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. हातून कळत-नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसार कैदी चार भिंतींच्या आत शिक्षा भोगत आहेत. हे कैदी समाजाच्या नजरेत गुन्हेगार आहे. मात्र, ज्या हातांनी गुन्हे घडले तेच हात रोजगार निर्मितीच्या दिशेने वाटचाल करूलागल्याचे चित्र अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात अनुभवता येत आहे. धानशेतीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ तुरूंगाधिकारी अशोक जाधव, तुरूंगाधिकारी शरद माळशिकारे, मोहन चव्हाण, गजानन क्षीरसागर, पांडुरंग भुसारे, वासुदेव सांळुके, रामदास बोंडे, कृषी सहायक गणेश भापकर, सांस्कृतिक विभागप्रमुख भूषण कांबळे प्रयत्नरत आहेत. एचएमटी धानाचे उत्पादन घेण्यात आले आहे. अमरावतीत हा प्रयोग यशस्वी होईल का? याबाबत साशंकता होती. परंतु नावीण्यपूर्ण प्रयोग करण्याच्या अनुषंगाने तीन एकरांत धानाच्या रोपांची लागवड करण्यात आली. बंदीजनांनी अतिशय परिश्रम घेतले. १२० किलो बियाण्यांतून सुमारे ६० क्विंटल धानाचे उत्पादन होईल, अशी शक्यता आहे.- भाईदास ढोले,अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावतीबाजारपेठेत एचएमटी तांदूळविक्रीचा मानसअमरावतीच्या मध्यवर्ती खुले कारागृहात बंदीजनांच्या परिश्रमातून एचएमटी वाणाचे धान उत्पादन घेण्यात आले आहे. लवकरच उत्पादित धानावर प्रक्रिया करून तांदूळ तयार केला जाईल. एचएमटी तांदळाला बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने कारागृहाच्या उत्पन्नवाढीसाठी ते विकले जाईल, असे संकेत अधीक्षक ढोले यांनी दिले आहेत. नियमानुसार शेतीकामाचे वेतनसुद्धा बंदीजनांच्या खात्यात जमा होणार आहेत.