अंबरनाथ : तालुक्यातील कान्होर गावात महिला बचत गटाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून भातशेती करायला सुरुवात केली आहे. भातलागवडीसाठी त्यांनी आदर्श मानल्या गेलेल्या ‘पॅडी ट्रान्सप्लांटर’चा अवलंब केला आहे. जिल्ह्यात प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. अपुरे मनुष्यबळ व पारंपरिक पद्धतीमुळे आतबट्ट्याची ठरू लागलेल्या भातशेतीला यामुळे नवसंजीवनी मिळू शकेल. जमाखर्चाचा मेळ जमत नसल्याने सध्या जिल्ह्यातील अनेक शेतकरी भातपीक घेणे टाळू लागले आहेत. त्यामुळे एकेकाळी भाताचे कोठार ही ठाण्याची असलेली ओळख मागे पडली आहे. वाडा कोलम ही भाताची जात आता केवळ नावापुरतीच उरली आहे. भातलागवड हे कष्टदायक काम असल्यामुळे त्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. एकेक रोप वाकून लावावे लागते. दीर्घ काळ हे काम केल्यास पाठदुखीचा त्रास होतो. त्यातूनही जे मजूर मिळतात, त्यांना पुरेसे प्रशिक्षण व अनुभव नसतो. परिणामी, अयोग्य पद्धतीने रोपांची लागवड केल्यामुळे भाताच्या उत्पादनात घट होते. यंत्रांमुळे या सर्व अडचणी दूर होऊन जिल्ह्यातील भात उत्पादनात क्र ांती होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.भातलागवडविषयक या समस्यांवर पॅडी ट्रान्सप्लांटर हे यंत्र सहजपणे मात करू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या यंत्राद्वारे शेतात एकसारखी (प्रमाणित) रोप लागवड होते. त्यामुळे दोन रोपांमध्ये योग्य अंतर राखले जाऊन उत्पादनात वाढ होते. पारंपरिक पद्धतीने एक हेक्टर क्षेत्रात भातलागवड करायची असेल तर १० मजुरांना दोन दिवस लागतात. या यंत्राद्वारे हेच काम तीन तासांत होते. त्यामुळे मजुरांच्या समस्येवर हा चांगला उपाय असल्याचे मत आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केले.पॅडी ट्रान्सप्लांटरला एका तासासाठी तीन लीटर इंधन लागते. त्यामुळे खर्चाच्या दृष्टीनेही हे व्यवहार्य आहे. त्यांच्यामार्फत शेतकरी या यंत्रांचा वापर करणार आहेत. या यंत्राद्वारे लागवड करण्यासाठी १४ दिवसांची रोपे लागत असल्याचे कृषी अधिकारी आर.एच. पाटील यांनी सांगितले. ती रोपे प्लास्टिकच्या ताडपत्रीवर तयार केली जातात आणि १४ दिवसांनी रोपे तयार झाली की, ती ‘पॅडी ट्रान्सप्लांटर’मध्ये टाकून त्यांची लावणी केली जाते. ही सर्व कामे महिला करत असल्याने त्यांना नवा रोजगारही मिळाला आहे. ‘चूल आणि मूल’ ही ओळख आता पुसून आता महिला शेतात पुरु षांच्या बरोबरीने काम करताना दिसणार आहेत. (प्रतिनिधी)>असे आहे नवे तंत्र आणि मंत्र, असा होईल त्यातून भरघोस फायदादोन दिवसांत मजुरांकडून जेवढे भातलावणीचे काम होईल तेवढे काम या तंत्राने होईल फक्त तीन तासांत.शेत मजुरांच्या टंचाईवर मात करणे, उत्पादन खर्चात घट घडविणे, उत्पादनात वाढ घडवणे होईल शक्य.महागडी व कष्टप्रद शेती ठरेल अधिक लाभदायीयामुळे घटत असलेले भातशेतीचे प्रमाण वाढेल. तसेच तिच्यापासून दुरावणारी शेतकऱ्यांची तरुण पिढी पुन्हा एकदा वळू लागले शेतीकडे.
पॅडी ट्रान्सप्लांटरची मदत
By admin | Published: July 19, 2016 3:51 AM